कडबाकुट्टीत अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू
जामखेड प्रतिनिधी(दि.१६ मे):-जामखेड तालुक्यातील खर्डा येथील लक्ष्मी विजय गोलेकर (वय ४७) यांचा कडबाकुट्टीत अडकून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत मुरहरी अंबादास इंगोले (वय ३७) यांनी पोलिस ठाण्यात माहिती दिली.रामचंद्र रामकिसन इंगोले यांच्या गट नं.७६ मधील शेतामध्ये कडबाकुट्टी मशीन सुरू होती.लक्ष्मी गोलेकर या कोयता घेण्यासाठी ट्रॅक्टरवर चढल्या. कोयता घेऊन खाली उतरत असताना त्यांची साडी ट्रॅक्टर व कुट्टी मशीन जोडण्याच्या शॉप्टमध्ये अडकली.यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. लक्ष्मी गोलेकर यांना जामखेडच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.तेथील डॉक्टरांनी लक्ष्मी गोलेकर यांची तपासणी केली असता त्यांना मयत घोषित केले.खर्डा पोलिस ठाण्यात या बाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.