पहाटे व्यायाम करणार्या तीन युवकांना अज्ञात वाहनाने चिरडले दोन ठार तर एक गंभीर जखमी
कर्जत प्रतिनिधी(दि.१९ मे):-कर्जत राशीन रस्त्यावर बेनवडी शिवारामध्ये व्यायाम करणार्या तीन युवकांना अज्ञात वाहनाने चिरडले.यात दोन जण ठार एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत घडलेली घटना अशी की, कर्जत राशीन रस्त्यावर बेनवडी शिवारामध्ये देशमुख वस्ती येथे पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास या परिसरातील सहा जण नेहमीप्रमाणे रस्त्याच्या कडेला व्यायाम करत होते.यावेळी भरधाव आलेल्या वाहनाने तिघा जणांना चिरडले.यामध्ये ओमप्रकाश तात्या धुमाळ (वय 18),संकेत परशुराम गदादे (वय 18) हे दोघेजण ठार झाले.अज्ञात गाडी चालक पसार झाला आहे.तर केदार अशोक गदादे हा गंभीर रित्या जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.यावेळी त्यांच्या समवेत असलेल्या ज्ञानेश्वर पांडुरंग देशमुख (वय 14) याच्या पायाला दुखापत झाली तर विशाल आप्पासाहेब धुमाळ (वय 16), सुधीर देशमुख (वय 17) हे बचावले आहेत. दरम्यान या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.