मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेकल्या प्रकरणी ११ पोलीस निलंबित ३ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश
प्रतिनिधी (दि.११. डिसेंबर):-राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर शनिवारी संध्याकाळी पिंपरी-चिंचवड येथे समता सैनिक दलाच्या एका कार्यकर्त्याने शाई फेकली होती.पोलिसांची सुरक्षा भेदून समता दलाचे कार्यकर्ते चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचले होते आणि त्यांनी थेट पाटील यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली.या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी आता गृहमंत्रालयाकडून त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. शाईफेक प्रकरणात ११ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.यामध्ये ८ पोलीस कर्मचारी आणि तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारने चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीचे प्रकरण गांभीर्याने घेतल्याचे दिसत आहे.याप्रकरणी आता पोलिसांच्या ताब्यात असलेल्या समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांवर काय कारवाई होणार,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.