बिबट्याच्या हल्ल्यात ८० वर्षीय वृध्द जखमी
अकोले प्रतिनिधी (दि.११.डिसेंबर):-बिबट्याच्या हल्ल्यात वृध्द जखमी झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील निंब्रळ येथे घडली असून निवृत्ती सयाजी उघडे (वय ८०) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वृध्दाचे नाव आहे. जखमी वृध्दावर नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.गुरुवारी रात्री एक वाजेच्या सुमारास निंब्रळ येथील निवृत्ती उघडे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला.उघडे हे घरात झोपलेले असताना बिबट्या त्यांच्या घरात घुसला.उघडे यांच्या अंगावर चादर असल्यामुळे विवट्याच्या हल्ल्याची तीव्रता कमी झाली.यावेळी झालेल्या झटापटीत वृद्ध निवृत्ती उघडे यांच्या हाताला बिबट्याने चावा घेतल्याने हाताला जखम झाली आहे. आरडा-ओरडा केल्यामुळे बिबट्याने घरातून पळ काढला.मात्र बिबट्याने वृध्दाच्या अंगावर असलेली चादर तोंडात घेऊन पोबारा केला.या घटनेची माहिती समजताच राजूर विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी राजश्री साळवे यांनी निंब्रळ येथे जाऊन पाहणी केली.राजूर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ जखमी वृद्ध निवृत्ती उघडे यांना अकोले ग्रामीण रुणालयात प्राथमिक उपचार करण्यात येऊन पुढील उपचार नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार दाखल करण्यात आले आहे.