चोरीतील मुद्देमाल विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना कोतवाली पोलिसांनी पकडले..
अहमदनगर प्रतिनिधी (दि.१५ जुन):-गुन्हेगारीला आळा बसावा,यासाठी कोतवाली पोलिसांकडून पायी पेट्रोलिंग करण्यावर भर दिला जात आहे.मंगळवार (ता.१२) कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचा मुद्देमाल विक्री करण्यासाठी आलेल्या एका तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.या कारवाई दरम्यान ८७ हजार ३०० रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला.गेल्या आठ दिवसात कोतवाली पोलिसांची ही दुसरी कारवाई असून याआधी तीन आरोपींना अटक केली होती.चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी काही इसम येणार असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती.या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक यादव यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार काटवण खंडोबा कमानीजवळ तीन चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी आलेल्या परवेज मेहबूब सय्यद (रा.काळे गल्ली, बुरुडगाव रोड,अहमदनगर) याला ५० हजार रुपये किमतीच्या तीन मोबाईलसह ताब्यात घेतले.तसेच,चोरीची मोपेड मोटार सायकल विक्री करण्यासाठी आलेल्या ऋषभ प्रकाश शेत्रे (रा.जहांगीरदार चाळ,बुरुडगाव रोड, अहमदनगर) याला चाणक्य चौक येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३० हजार रुपये किमतीची मोपेड मोटरसायकल जप्त करण्यात आली.तिसरी कारवाई पुणे बस स्थानक परिसरात करण्यात आली.पेट्रोलिंगवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी एका संशयितरित्या फिरत आसलेल्या महिलेची चौकशी करून झडती घेतली असता चोरीतील ७ हजार ३०० रुपये रोख रक्कम आढळून आली. पोलिसांनी तिला तिचे नाव विचारले असता अश्विनी अविनाश भोसले (रा. माहीजळगाव,ता.कर्जत जि. अहमदनगर) असे सांगितले. प्रवासी बस मध्ये चढताना सदरची रक्कम चोरी केल्याचे कबूल केले.कोतवाली पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींवर चोरीचा मुद्देमाल बाळगून विल्हेवाट लावण्याच्या तयारीत असल्याबाबत मुंबई पोलीस कायदा कलम १२४ अन्वये तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.रोख रक्कम घेऊन जाण्याचे नागरिकांना आवाहन-पुणे बस स्थानकावर ११ जून आणि २९ मे रोजी नागरिकांचे पैसे चोरणाऱ्या महिलांना कोतवाली पोलिसांनी पकडलेले आहे.त्यांच्याकडून अनुक्रमे ७,३०० आणि ३,१०० रुपये जप्त केलेले आहेत.त्याबाबत ज्यांचे पैसे चोरी गेले त्यांनी पोलीस स्टेशनला कळविले नाही. सदर दिवशी ज्यांचे पैसे चोरीला गेलेले आहेत त्यांनी कोतवाली पोलिसांना तक्रार देऊन रक्कम घेऊन जावी.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक/चंद्रशेखर यादव,पोहेकॉ/गणेश धोत्रे, पोना/योगेश भिंगारदिवे, अभय कदम,पोकाॅ/सागर मिसाळ,कैलास शिरसाट, संदिप थोरात,अमोल गाढे, अतुल काजळे,सुजय हिवाळे, सोमनाथ राऊत,मपोकाॅ/शिला ढेरे,पोहेकाॅ/सोनवणे यांच्या पथकाने केली.