नगर प्रतिनिधी(दि.२२ जुलै):-अहमदनगर जिल्ह्यातील खारे कर्जुने येथुन भारतीय सैन्य दलाचे दृष्टीने संवेदनशिल असणारा दारुगोळा व स्फोटक पदार्थ अवैधरित्या कब्जात बाळगणारा आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व सदन कमान मिलेट्री इंटेलिजेन्स विभाग पुणे यांना यश आले आहे.बातमीची हकिगत अशी की,दि. 21 जुलै 2023 रोजी श्री.राकेश ओला पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,खारे कर्जुने,ता.अहमदनगर येथील इसम नामे दिनकर भोसले हा त्यांचे राहते घरी भारतीय सैन्य दलात वापरला जाणारा दारुगोळा व स्फोटक पदार्थ अवैधरित्या कब्जता बाळगतो आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाली.अहमदनगर जिल्हा हा सैन्य दलाचे दृष्टीने अतिशय महत्वाचा व संवेदनशिल असल्याने अशा प्रकारे कोणी सैन्य दलातील दारुगोळा अवैधरित्या कब्जात बाळगुन घातपात करण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.तरी वरील प्रमाणे घटना निदर्शनास आल्यानंतर घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन श्री. राकेश ओला पोलीस अधिक्षक यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर,स्थानिक गुन्हे शाखा तसेच सदन कमान मिलेट्री इंटेलिजेन्स विभाग पुणे येथील अधिकारी, दहशतवाद विरोधी शाखा अहमदनगर,बीडीडीएस अहमदनगर व एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी, अंमलदार व पंचाना बरोबर घेवुन नमुद बातमीतील संशयीत इसमाची खात्री करुन कायदेशिर कारवाई करणे बाबत आदेश दिले.नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचारी,सदन कमान मिलिट्री इंटेलिजेन्स, पुणे येथील पोलीस अधिकारी,दहशदवाद विरोधी शाखा,अहमदनगर, बीडीडीएस पथक व एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन कारवाई करणे बाबत नियोजन करुन मार्गदर्शन केले.वरील प्रमाणे पथकाने खारे कर्जुने येथे जावुन संशयीत इसम नामे दिनकर शेळके यांचे वास्तव्या बाबत माहिती घेतली.त्यावेळी संशयीताचे घरा बाहेर एक इसम उभा असलेला दिसला. पथकाने अचानक छापा टाकुन उभा असलेल्या इसमास ताब्यात घेतले.त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1)दिनकर त्रिंबक शेळके, वय 65,रा.कर्जुने खारे,ता. नगर असे असल्याचे सांगितले.त्याचे कडे भारतीय सैन्य दलात वापरला जाणारा दारुगोळा व स्फोटक पदार्थाबाबत विचारपुस करता सुरुवातीस तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला,त्यास अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने चौकशी करता त्याने राहते घरा समोरील पत्र्याचे शेडमध्ये आडगळीच्या सामाना खाली सदर दारुगोळा,स्फोटक पदार्थ व साधने ठेवलेली आहेत अशी माहिती दिल्याने त्यास 18 टॅन्क राऊंड,5 मोटार राऊंड,8 ऍ़म्युनेशन पिस्टल राऊंड,16 पिस्टल राऊंड,40 स्विचेस,लाल पिंवळी वायर बंडल व 25 किलो टीएनटी पावडर असा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करुन आरोपीस मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे.ताब्यात घेतलेल्या आरोपी विरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. 649/2023 स्फोटक पदार्थ अधिनियम कलम 4 व भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक, व श्री.अनिल कातकाडे उपविभागीय पोलीस अधिकारी,नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/सोपान गोरे,पोहेकॉ/देवेंद्र शेलार,पोना/रविंद्र कर्डीले,संतोष खैरे,फुरकान शेख,पोकॉ/शिवाजी ढाकणे,अमृत आढाव,जालिंदर माने,मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड,तसेच एमआयडीसी पोलीस ठाणे पोसई/चांगदेव हंडाळ,पोहेकॉ/आसाराम मुटकेळे,संजय येठेकर, तवार,पोना/महादेव गरड, पळसकर,पोकॉ/सुरेश सानप,सी.बी.खेडकर, बाबासाहेब काळे,ए. एस. कांबळे,दहशतवाद विरोधी पथक,बीडीडीएस व एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
