संगमनेर (राजेंद्र मेढे):-पावसाने फिरवलेली पाठ,दिवसभर ऊन वारा मोकळे आकाश,विहिरी, बोरवेलने गाठलेला तळ पाण्याअभावी मरणाला टेकलेली पिके खरिपासाठी केलेला लाख मोलाचा खर्च वाया जाण्याची भीती अशा मनस्थितीत संगमनेर तालुक्यातील शेतकरी आहे.
पावसाअभावी दुष्काळाचे संकट घोंगावत असून शेवटच्या टप्प्यात पावसाळा आला तरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढवली आहे त्यामुळे बळीराजाची झोप उडाली आहे.तालुक्यात समाधानकारक पाऊस न पडल्याने काही भागात पेरण्या देखील झाल्या नव्हत्या.ज्या भागात खरीपाच्या पेरण्या झाल्या होत्या त्या भागात देखील साधारणपणे दीड ते दोन महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन,बाजारी,मका,कडधान्य आदी पिके आता पाण्यावाचून करपू व सुकु लागली आहे.आज पाऊस पडेल उद्या पाऊस पडेल या अपेक्षावर शेतकरी पावसाची दररोज वाट बघायचा.पावसाने मात्र पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे.त्यामूळे शेतकरी हावलदिल झाले आहेत.पावसाची आस लागलेल्या शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास आता पावसाआभावी हिरावला जाताना दिसतो आहे. शासनाने यंदा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.यावेळी बोलताना काही शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
