संगमनेर (राजेंद्र मेढे):-शहरातील नावाजलेल्या दूधगंगा पतसंस्थेमध्ये तब्बल ८० कोटी ७९ लाख ४१ हजार ९८१ रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुटे, व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ यांच्यासह एकूण 21 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील चार जणांना अटक करण्यात आले आहे.प्रलंबित निर्णयानंतर दूधगंगा पतसंस्थेतील अपहार प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने ठेवीदार व सभासदांनी समाधान व्यक्त केले आहे.गेल्या दीड वर्षांपासून दूधगंगा पतसंस्थेतील आर्थिक अपहाराचे प्रकरण गाजत होते.या पतसंस्थेचे २०१६ ते २०२१ या पाच वर्षांचे फेर लेखा परीक्षण करण्यात आले या लेखापरीक्षणांमध्ये आर्थिक फेरफार झाल्याचे उघड झाले.यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी विशेष लेखा परीक्षकांना गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिली. गुन्हा दाखल होण्यास विलंब होत असल्याने ठेवीदारांनी संताप व्यक्त केला होता. जिल्हा विशेष लेखापरीक्षक राजेंद्र निकम यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अखेर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.दूधगंगा पतसंस्थेचे अध्यक्ष,व्यवस्थापक यांच्यासह नातेवाईकांनी ८० कोटी ७९ लाख ४१ हजार ९८१ रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.या अपहार प्रकरणी जिल्हा विशेष लेखापरीक्षक राजेंद्र फकिरा निकम यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार शहर पोलिसांनी 21 व्यक्तींविरुद्ध 740/2023 भारतीय दंड संहिता 420, 408,409, 465,467,471,477 अ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
