अहमदनगर (दि.४ सप्टेंबर):-जगातील सर्वोत्तम दहा शाळांमध्ये समावेश झालेल्या स्नेहालय इंग्लिश मीडियम शाळेमध्ये शिक्षक दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली.वंचित मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कल्पकता दाखवणाऱ्या,शिक्षण आनंददायी आणि आशयसंपन्न करण्यासाठी चाकोरीबाहेरचे प्रयत्न करणाऱ्या,वाचनाची आवड जोपासणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्याची कल्पना स्नेहालयाचे विश्वस्त पालक किरीटी मोरे यांनी मांडली.
त्यांच्या मातोश्री इंदिरा शामकांत मोरे या पुण्यातील महापालिकेच्या शाळेत दीर्घकाळ अध्यापन करत होत्या.विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी, असे शिक्षण देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर धडपड केली. त्यांच्या निवृत्ती वेतनाच्या साठवलेल्या पैशांची त्यांच्या इच्छेनुसार श्री.मोरे यांनी स्नेहालयाला देणगी दिली.या ठेवीवरील व्याजातून दरवर्षी आदर्श शिक्षकांसाठी पुरस्काराची योजना स्नेहालयाने सुरू केली.स्व. शोभाताई महादेव कुलकर्णी यांनी भिंगार हायस्कूलमध्ये ३६ वर्षे अध्यापन केले. कष्टकरी परिवारातील मुलींना त्यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले.स्नेहालयाचे पहिले वसतिगृह त्यांच्याच घरात सुरू झाले.या बालकांचे मातृत्वही त्यांनी स्वीकारले. त्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो.पुरस्काराचं हे चौथे वर्ष आहे.यावर्षी श्रीमती इंदिरा शामकांत मोरे पुरस्कृत स्व.शोभा महादेव कुलकर्णी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी बाई इचरज बाई फिरोदिया प्रशालेतील प्राथमिक शिक्षक वैभव भगवान वाघ,स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलमधील प्राथमिक शिक्षक शबाना ताज शेख व बालभवनचे शिक्षण समन्वयक विक्रम सुधाकर भगत यांची निवड करण्यात आली.स्व.प्रा.गोपालभाई गुजर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणार्या आदर्श कर्मचारी पुरस्कारासाठी स्नेहालय संस्थेतील वरिष्ठ लेखापाल समाधान तुकाराम भाले यांची निवड करण्यात आली आहे.
मंगळवार दि.5 सप्टेंबर रोजी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल,एमआयडीसी या ठिकाणी सकाळी 11 वाजता पुरस्कार वितरण होईल. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ अध्यापक मकरंद विष्णू खेर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.संस्थेचे विश्वस्त पालक किरीटी मोरे यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण केले जाणार असल्याचे निवड समितीचे सदस्य व स्नेहालयाचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी,शाळेचे संचालक राजेंद्र शुक्रे, संचालक हनिफ शेख व मुख्याध्यापिका क्षितिजा हडप यांनी सांगितले.अहमदनगर जिल्हा व शहरातील शिक्षक व नागरिकांनी पुरस्कार सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन स्नेहालयाचे अध्यक्ष संजय गुगळे व सचिव राजीव गुजर यांनी केले आहे.
