Maharashtra247

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा मोहिमे अंतर्गत १ ऑक्टोबरला “एक तारीख” “एक घंटा महाश्रमदानाचे” आयोजन 

अहमदनगर (दि.३० सप्टेंबर):-केंद्र सरकारच्या निर्देशानुसार अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून एक तास श्रमदान मोहीम राबवण्यात येणार आहे.

या मोहिमेअंतर्गत ग्रामीण भागात सर्वत्र स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून,सर्व नागरिकांनी,स्थानिक लोकप्रतिनिधींनी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन, आशिष येरेकर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑक्टोबर रोजी देशभर श्रमदान मोहीम राबविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यात एक तास श्रमदान करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. महात्मा गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला ही मोहीम राबवून महात्मा गांधीजींना हीच खरी श्रद्धांजली ठरणार आहे. श्रमदान मोहिमेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात गावागावात सार्वजनिक परिसर,शाळा,अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र,आरोग्य उपकेंद्र, मंदिरे,बाजारतळ,बस स्थानक,नदी किनारे,तलाव ठिकाणी तसेच इतर ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे.

या मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायती स्वच्छता मोहिमेसाठी जागा निवडतील. ही सर्व ठिकाणे नकाशावर उपलब्ध असतील, https://swachhatahiseva. com या सिटिझन पोर्टलवर उपलब्ध पर्यायांद्वारे पाहता येतील आणि निवडता येतील. याद्वारे नागरिक स्वच्छता अभियानाच्या ठिकाणी त्यांचे फोटो क्लिक करू शकतील आणि ते या पोर्टलवर अपलोड करू शकणार असल्याची माहिती समर्थ शेवाळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद अहमदनगर यांनी दिली.

You cannot copy content of this page