
अहमदनगर (दि.२५ ऑक्टोबर):-छत्तीसगड येथुन कोपरगाव शहरामध्ये विक्री करीता आणलेला गांजा जवळ बाळगणाऱ्या ०३ आरोपीस मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे अंमलदार यांनी पकडले आहे.
बातमीची हकिगत अशी की,अहमदनगर जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर अंमली पदार्थ बाळगणारे इसमांची माहिती काढुन त्यांचे विरुध्द अंमली पदार्थ कायद्यांतर्गत कारवाई करणेबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी पोनि/श्री दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेश दिलेले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/तुषार धाकराव,सफौ/भाऊसाहेब काळे,पोहेकॉ/दत्तात्रय गव्हाणे,मनोहर गोसावी,रविंद्र पांडे,पोना/सचिन अडबल,संतोष खैरे, चापोहेकॉ/संभाजी कोतकर यांचे ” विशेष पोलीस पथक ” स्थापन करुन अहमदनगर जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर अंमली पदार्थ बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले होते.
पोलीस पथकातील अधिकारी व अंमलदार असे शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बेकायदेशीर अंमली पदार्थ बाळगणारे इसमांची माहिती काढत असतांना पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांना गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे आजीम कुरेशी,रा. कोपरगाव व त्याचे दोन साथीदार असे काळया रंगाच्या ड्रिम युगा विना नंबरच्या मोटारसायकलवरुन ट्रिपल सिट साई कॉर्नर,कोपरगाव येथे सायंकाळी ०७.४५ वा.चे. सुमारास अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी घेवून येणार आहेत अशी बातमी मिळाली. त्यानंतर पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ कोपरगांव शहर पोलीस स्टेशन येथे जावुन तेथील पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप देशमुख यांना बातमीतील हकीगत सांगुन छाप्याचे नियोजन केले.कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप देशमुख,पोउपनि/रोहिदास ठोंबरे,पोकॉ/गणेश काकडे,पोकॉ/राम खारतोडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कोपरगांव शहर पोलीस स्टेशन हद्दीमधील साई कॉर्नर, कोपरगाव या ठिकाणी जावुन सापळा रचुन थांबले असता बातमीतील हकीगतीमधील वर्णनाची मोटारसायकल व त्यावर तीन इसम येतांना दिसले.पोलीस पथकाने मोटारसायकलवरील इसमांना थांबणेबाबत इशारा केला असता ते त्या ठिकाणाहून पळून जाण्याचा प्रयत्न करु लागले.
त्यावर पथकाने योग्य त्या बळाचा वापर करुन त्यांना ताब्यात घेवून त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे १)अजीम जाफर कुरेशी रा.संजयनगर, कोपरगाव,जि.अहमदनगर मुळ रा.पी.एम.जी.कॉलनी,मानखुर्द,मुंबई २) वाजीद कलीम कुरेशी रा. संजयनगर,कोपरगाव,जि. अहमदनगर ३) सुलतान रमजान अख्तार रा. संजयनगर,कोपरगाव,जि. अहमदनगर असे असल्याचे सांगितले.
सदर इसमांची पंचासमक्ष झडती घेता त्यांचे कब्जामध्ये १० किलो वजनाचा अंमली पदार्थ गांजा, तसेच ०३ मोबाईल,एक विनानंबरची होंडा कंपनीची ड्रिम युगा मोटारसायकल असा एकुण ३,४०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो हस्तगत करण्यात आला आहे.सदर इसमांकडे अंमली पदार्थ गांजा कोठुन आणला याबाबत अधिक विचारपुस करता त्यांनी सदरचा अंमली पदार्थ गांजा हा तौफीक तांबोळी (पुर्ण नाव माहित नाही) इदगाह फाटा,लाकेनगर, रायपुर, छत्तीसगड याचे कडुन आणला असल्याचे सांगितले आहे.या बाबत त्यांचे विरुध्द पोहेकॉ/२९६४ दत्तात्रय विठ्ठल गव्हाणे नेम स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कोपरगांव शहर पोलीस येथे स्टेशन गु.र.नं. ५०३ / २०२३ गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन १९८५ चे कलम ८ (क) सह २० (क) व २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोनि श्री.प्रदिप देशमुख कोपरगांव शहर पोलीस स्टेशन हे करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्रीमती स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर व श्री.संदीप मिटके उपविभागीय पोलीस अधिकारी,शिर्डी विभाग शिर्डी यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर व कोपरगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.