जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश लागू
धाराशिव (संतोष खुने):-जिल्ह्यात मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी जिल्ह्यातील विविध भागात धरणे,आंदोलने,रस्तारोको व उपोषणे सुरू आहे.
उमरगा तालुक्यातील तुरोरी येथील कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस जाळण्यात आली.शेजारच्या बीड जिल्ह्यात आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने ठिकठिकाणी जाळपोळीच्या घटना घडलेल्या आहेत.या घटनांच्या पडसादामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जिल्ह्यात चालू असलेल्या आंदोलनामुळे सार्वजनिक व खाजगी मालमत्तेस मोठ्या प्रमाणात हानी पोहोचत आहे.
त्यामुळे जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 (2) चे संचारबंदीचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी लागू केले आहे.आज 31 ऑक्टोबर रोजी वाशी तालुक्यातील इंदापूर,धाराशिव तालुक्यातील येडशी व तुळजापूर येथे ठिकठिकाणी रास्ता रोको,बैलगाडी व रेलरोको करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील संचारबंदीचे हे आदेश शैक्षणिक संस्था,शाळा,महाविद्यालये व दुकाने यांनाही लागू राहतील.या कालावधीत पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही तसेच कोणत्याही प्रकारचे शस्त्र,ज्वलनशील पदार्थ सोबत बाळगता येणार नाही.
या आदेशातून शासकीय/निमशासकीय कार्यालये, दूध वितरण,पिण्याचे पाणीपुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणाऱ्या आस्थापना,सर्व बँका, दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या आस्थापना, रस्ते वाहतूक व रेल्वे व्यवस्था, दवाखाने,वैद्यकीय केंद्र, औषधी दुकाने,रुग्णवाहिका विद्युत पुरवठा,ऑइल व पेट्रोलियम व ऊर्जा संसाधने,प्रसार माध्यमे,मीडिया,अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आयटी आस्थापना,अंत्यविधी व अंत्ययात्रा यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.