
अहमदनगर (दि.१ नोव्हेंबर):-मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी सुरु असलेल्या आंदोलन व मनोज जरांगे यांच्या उपोषणास अहमदनगर शहर बार असोसिएशने जाहीर पाठींबा दिला आहे.
मराठा समाजाच्या हक्काचे आरक्षण त्वरित ओबीसी मधूनच मिळावे या मागणीचे निवेदन शहर वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड.संजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील वकिलांच्या शिष्ठमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तसेच तहसील कचेरी येथे सुरु असलेल्या उपोषण कर्त्यांची भेट घेवून त्यांनाही जाहीर पाठींबाही देण्यात आला.
आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मराठा समाजातील ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल होतील त्यांना निर्दोष सोडवण्यासाठी त्यांच्या सर्व केसेस मोफत लढण्याचा निर्धार सर्व वकिलांनी केला आहे.तशी घोषणा संघटनेचे ॲड.संजय पाटील यांनी आज केली.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय… जय जिजाऊ…जय शिवाजी… एक मराठा लाख मराठा… अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
तत्पूर्वी मंगळवारी दुपारी जिल्हा न्यायालयात झालेल्या शहर वकील संघटनेच्या बैठकीत मराठा समजला आरक्षण मिळण्यासाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना व सकल मराठा समाजाच्या आंदोलनास जाहीर पाठिबा देण्याचा ठराव मांडण्यात आला,तो सर्व वकिलांनी एकमताने मंजूर केला.