शहरात वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी बालदिनाचे आयोजन स्नेहालय भवन येथे होणार बालविवाह मुक्तीसाठी उडान प्रकल्पाचा लोकार्पण
अहमदनगर (दि.१३ नोव्हेंबर):-स्नेहालय संचलित उडान प्रकल्प,मराठी पत्रकार परिषद,जिल्हा महिला व बालविकास कार्यालय,जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्प लाईन अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती निमित्त वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी मंगळवार (दि.14 नोव्हेंबर) बालदिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील गांधी मैदान,चित्रा टॉकीजसमोरील स्नेहालय भवन येथे संध्याकाळी 4 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. बालविवाह मुक्त जिल्हा घडविण्यासाठी स्नेहालय संचलित उडान प्रकल्पाचे लोकार्पण व बालविवाह मुक्ती मिशनचे उद्घाटन राज्य बाल हक्क आयोगाच्या सदस्या सायली पालखेडकर व मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मन्सूर शेख यांच्या हस्ते होणार आहे.
स्नेहालय संस्था ही मागील 33 वर्षापासून वंचित घटकांसाठी काम करत आहे. यामुळे जिल्ह्यातील सामाजिक प्रश्नांवर चांगला परिणाम घडवून आणण्याचा पुढाकार स्नेहालय संस्थेने केला आहे.
त्याचाच एक भाग म्हणजे कोरोनापासून उद्भवलेली समस्या,बालविवाह या समस्येला मुळापासून नष्ट करण्यासाठी स्नेहालयचे संस्थापक डॉ.गिरीश कुलकर्णी,अध्यक्ष संजय गुगळे,सचिव राजीव गुजर, उडान प्रकल्पाचे मानद संचालक ॲड.बागेश्री जरंडीकर,अनिवासी प्रकल्पाचे संचालक हनीफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेहालयाने जिल्हा प्रशासनासोबत उडान बालविवाह प्रतिबंधक अभियान जिल्ह्यात राबवून मागील 4 वर्षात 300 पेक्षा जास्त बालविवाह रोखण्यात यश मिळविले आहे. अहमदनगर जिल्हा बालविवाह मुक्त जिल्हा करण्याकरिता स्नेहालय संस्थेच्या अंतर्गत उडान या स्वतंत्र प्रकल्पाची नव्याने संरचना करण्यात आली आहे. हा प्रकल्प संपूर्ण जिल्ह्यासाठी बालविवाहास बळी पडणाऱ्या बालकांना शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन आणि पुनर्वसन करण्यासाठी काम करेल. त्यातून अनेक बालकांचे जीवन सावरले जाणार आहे. तसेच बालविवाह प्रतिबंधक कायद्याची सक्रिय अंमलबजावणी आणि बालविवाह विषयक जनजागृती करण्यासाठी सुद्धा हा प्रकल्पांतर्गत काम केले जाणार असल्याचे स्नेहालय परिवाराच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
बालदिन बालविवाह मुक्ती मिशन कार्यक्रमातंर्गत बालविवाह व हक्कवंचित बालकांपर्यंत पोहचण्याकरिता व त्या बालकांना काळजी, संरक्षण, शिक्षण आणि भविष्य देणाऱ्या सुसंघटीत स्वयंसेवक, बालमित्र व सामन्य लोक गटाची निर्मिती केली जाणार आहे. शासकीय व निमशासकी यंत्रणांशी सहसंबंध प्रस्थापित करून बालकांच्या अधिकाराविषयी जनजागृती केली जाणार आहे. बालकांना त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन व त्यावरील उपाय, कार्यवाहीविषयी माहिती देणे. बालकांना व सर्व नागरिकांना बालविवाह मुक्ती मिशन सप्ताहाची ओळख करुण देणे. बालविवाह पिडीत बालकांच्या समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्याची व उडान प्रकल्प आणि चाईल्ड हेल्पलाईनची माहिती पोहचविण्याचे काम केले जाणार आहे.
बालदिन बालविवाह मुक्ती मिशन कार्यक्रम पुढील प्रमाणे:- 20 नोव्हेंबर रोजी शहरातील महत्वाच्या झोपडपट्टीच्या ठिकाणी बालविवाह व बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षणाची जनजागृती केली जाणार आहे.23 नोव्हेंबर रोजी नगर तालुक्यातील लग्न लावणारे व्यवस्थापिक घटक यांचा बालविवाह एक अभिशाप हा मेळावा शहरातील पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेतला जाणार आहे.
26 व 27 नोव्हेंबर रोजी स्नेहालय संस्था येथे संविधान दिनाच्या अनुषंगाने बालविवाह जनजागृती युवक मेळावा घेतला जाणार आहे. यादिवशी युवक व युवतींना एकत्रित करून बालविवाह प्रतिबंधक कायदा विषयक जनजागृती करण्याचा मानस आहे.28 नोव्हेंबर रोजी शहरातील सर्व बस स्टॅन्ड, कापड बाजार आदी गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी बालविवाह प्रतिबंधाचे पोस्टर लावून जनजागृती केली जाणार आहे.