पो.नि.चंद्रशेखर यादव यांना उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान;कर्तृत्वाचा सन्मान करताना विशेष आनंद-पद्मश्री पोपटराव पवार
अहमदनगर (दि.२३ नोव्हेंबर):-येथील कोतवाली पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना द युवा ग्रामीण पत्रकार संघ व सत्यजित महाराष्ट्र मराठी यांच्या वतीने ‘उत्कृष्ट अधिकारी राज्यस्तरीय पुरस्कार-2023′ आदर्शगाव हिवरेबाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी शिक्षक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित, केडगाव पत्रकार संघाचे अध्यक्ष समीर मन्यार,न्यूज टुडेचे संपादक अफताब शेख, संघाचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख,प्रदेश कार्याध्यक्ष श्याम कांबळे,उपाध्यक्ष तुकाराम कामठे,सचिव राजेंद्र वाघमारे,रफिक शेख,रशीद शेख (ठाणे), प्रवीण पाटील (सातारा) यांच्यासह संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री.पोपटराव पवार म्हणाले की,पो.नि.यादव ज्या ज्या ठिकाणी कार्यरत राहिले, त्या त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कार्यकुशलतेने अनेकांना न्याय मिळवून दिला.अनेक गुन्हे उघडकीस आणले.याबरोबरच सामाजिक भावनेतून चांगले उपक्रम हाती घेतले.त्यांच्या कार्याचा गौरव करताना मला विशेष आनंद होत आहे,असे सांगितले.
सत्कारास उत्तर देताना श्री. यादव म्हणाले की,पोलीस खात्यात कार्यरत असताना नियमाप्रमाणे बदल्या होतच असतात.नवीन कामाच्या ठिकाणी रुजू झाल्यानंतर आपली शिस्त इतरांना लावणे सोपे नसते.सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याची आपली पद्धत असून, त्यामुळे गुन्ह्यांची उकल होणे अधिक सोपे होते. विविध ठिकाणी कार्यरत असताना मिळालेली शाबासकीची थाप आपणास नेहमीच कर्तव्याची जाणीव करून देते. या जाणिवेतूनच अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते, असे ते म्हणाले.श्री.यादव यांनी वर्धा येथे स्थानिक गुन्हे शाखेत नेमणूक असताना विविध प्रकारचे 136 गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल तत्कालीन पोलीस अधीक्षक अश्विनी दरोज यांच्या हस्ते उत्कृष्ट अधिकारी म्हणून सन्मानित करण्यात आले होते.बावडा पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस असताना इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीत अनेक गुन्हे त्यांनी उघडकीस आणले.
भिगवन येथे पोलीस स्टेशनच्या प्रभारी चार्ज उत्कृष्टपणे त्यांनी पार पाडला. या ठिकाणी काम करत असताना त्यांनी सामाजिक सलोख्याचे अनेक उपक्रम राबवले. याची दखल घेत तत्कालीन आमदार आणि महावितरण चे विभाग प्रमुख यांनी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार झाला होता.बारामतीत त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला.याची दखल घेत समर्थ फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. नगर जिल्ह्यात कर्जत येथे काम करत असताना अवैद्य सावकाराविरुद्ध कारवाई करून सामान्य नागरिक व शेतकरी यांना न्याय दिला. महिला व मुलींची छेडछाड या विषयावर मोठ्या प्रमाणात काम करून वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले वाहतुकीचे प्रश्न सोडवले.
चोरी दरोड्यासाठी खूप प्रसिद्ध असलेल्या चोरट्यांना जेरबंद करून जेलची हवा दाखविली. प्रसिद्ध अशी राशीनच्या देवीची यात्रा आणि कर्जत येथील गोदड महाराज यांची यात्राही अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडल्या यावेळी सीसीटीव्ही, दर्शन रांग असा नवा पायंडा तयार केला आणि कर्जत तालुक्यात आपल्या कार्याचा ठसा उमटवला.नगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन येथे ते कार्यरत असून, येथेही त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना कामाचा वेगळा ठसा उमटवला. या कामाची दखल घेत त्यांना उत्कृष्ट कर्मचारी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व पोलीस खात्यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले आहे.