
अहमदनगर (दि.२८ नोव्हेंबर):-महाराष्ट्रातील महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात अडल्या आहेत.

यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. त्यावर पुढील तारखा मिळत आहे.त्यातच आता नगर शहर महापालिकेची मुदत ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपत असल्याने निवडणुका रखडलेल्या महापालिकांच्या यादीत नगरचीही भर पडणार आहे.आता जिल्हापरिषद, पंचायत समितीप्रमाणे महापालिकेतही प्रशासक राज येणार आहे.महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या अनेकांनी गेल्या दोन-तीन वर्षात डोक्याला बाशिंग बांधून ठेवले आहे.
गणेशोत्सव-नवरात्रापासून अन्य सार्वजनिक उत्सवात तरुण मंडळांना खूश ठेवण्यासाठी खूप खर्च केला आहे.त्याआधीही अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यातही पुढाकार घेतला होता.
परंतु, निवडणुकाच होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नसल्याने आणखी किती वाढीव खर्च करायचा, अशी चिंता इच्छुकांना पडली आहे.परंतु महानगरपालिकेत प्रशासक राज येणार हे मात्र निश्चित झाले आहे.