
संगमनेर (राजेंद्र मेढे):-संगमनेर तालुक्यात प्रचंड प्रमाणात अवैध वाळूचा उपसा सुरू असताना महसूल प्रशासन रोखण्यात अपयशी ठरल्याचे स्पष्ट होत आहे.
घोषणाबाजी करून नव्हे तर त्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले पाहिजे जनतेला वाळू मिळत नाही अधिकृत वाळू मिळत नसल्यामुळे चोरीची वाळू विकत घ्यावी लागत आहे. दुप्पट तिप्पट किमतीमध्ये वाळू विकत घेऊन कामे करावी लागतात.नगर जिल्ह्यात वाळू तस्करांची मुजोरी वाढत चालली असून प्रवरा, म्हाळुंगी,मुळा,आढळासह जिल्ह्यातून वाहणाऱ्या विविध नद्यांच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा सुरूच आहे.
वाळू तस्करी करणार्याना कुठलाही धाक राहिला नसून त्यांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक देखील राहिलेला नाही.संगमनेर तालुक्यात वाळू तस्करीचे प्रमाण मोठे आहे. यावेळी वाळू तस्करांनी पोलिसांच्या ताब्यात असलेले वाहन चोरून नेल्याची घटना घडली आहे.पोलिसांच्या ताब्यात असणारे आणि तेही पोलीस लाईनच्या आवारात ठेवलेले वाहन चोरून नेण्याची कृती म्हणजे थेट पोलिसांना आणि महसूल विभागाला आव्हान असल्याचे बोलले जात आहे.
वाळू तस्कर कोणालाही भीत नाहीत. महसूल विभागाचे कुठलेही नियंत्रण वाळू तस्करांवर राहिलेले नाही.शहरासह तालुक्यातील विविध भागात नदी पात्रातून वाळू तस्करी जोमाने सुरू आहे.महसूलमंत्र्यांच्या वाळू धोरणाला महसूल विभागाने तिलांजली दिली असल्याचा प्रकार दिसून येत आहे.
संगमनेर शहरात असणाऱ्या पोलीस लाईनच्या आवारामध्ये एक पिकअप जीप जप्त करून ठेवण्यात आली होती. या जीपमध्ये एक ब्रास वाळू देखील होती.विना नंबरची ही गाडी पोलीस लाईन मधून चोरून नेण्यात आली आहे.पोलिसांनी फक्त गुन्हा दाखल करण्याचे काम केले आहे.बाबाजी किसन जेडगुले (वय ५१, मंडळ अधिकारी, संगमनेर बुद्रुक) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. विशेष म्हणजे दिवसाढवळ्या सकाळी सकाळीच ही वाळूने भरलेली पिकअप जीप संबंधित आरोपींनी चोरून नेली आहे.
भर दिवसा अशी चोरी झाल्याने पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या कारभाराविषयी शंका उपस्थित होत आहेत.या चोरीकडे दुर्लक्ष करण्यात आले की गाडी नेण्यासाठी संबंधित विभागांच्या भ्रष्ट व्यक्तींनी चोरांना पाठिंबा दिला याचा शोध घेणे महत्त्वाचे आहे.दिनांक २५ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर २०२३ दरम्यान सकाळी ही घटना घडली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याचा अर्थ गाड़ी चोरी होऊन एक महिना झाला तरी पोलिसांना त्याचा थांगपत्ता लागलेला नव्हता. पोलीस लाईन मधून चोरी केलेली वरील वर्णनाची विनानंबर प्लेट,एक ब्रास वाळू असलेली पिकअप जम करून ठेवण्यात आली होती.सदर वाहन वरील दोन्ही आरोपींनी चोरून नेले असल्याची फिर्याद देण्यात आली आहे.मोहन बारकू भोकनळ,शिवाजी राधाकिसन घुले यांच्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.