
अहमदनगर (दि.२८ डिसेंबर):-अपंग प्रमाणपत्र काढण्यासाठी अपंग व्यक्तीऐवजी दुसरीच व्यक्ती डॉक्टरांसमोर उभी करून प्रमाणपत्र घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पकडले आहे.

त्यांच्या विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशोक अर्जुन यादव (रा. लिंबारी,जिल्हा बीड व राहुल संपत आभाळे (रा.मढी खुर्द, ता. कोपरगाव, जिल्हा नगर), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.याबाबत सिव्हील हॉस्पिटलचे कर्मचारी दत्तात्रय झुंबर घाडगे (रा. पाईपलाईन रोड) यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी (ता.२७ डिसेंबर) रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास अशोक यादव व राहुल आभाळे हे दोघे जिल्हा रुग्णालयात आले. तयांनी शुभम सुनील तरटे (रा. गुरव पिंपरी, ता. कर्जत) याच्या नावाने केस पेपर काढला. त्यानुसार यादव हा रांगत रांगत तपासणीसाठी अस्थिव्यंग विभागात डॉ.बापू गाढे यांच्या दालनात आला.
त्यावेळी त्यांच्यासोबत आभाळे होता.डॉ.गाढे यांनी यादव याची कागदपत्रे तपासली.तेव्हा आधार कार्डवर फोटो यादवचा,तर नाव शुभम तरटे याचे दिसले. तरटे याचे नावे केस पेपर असताना तो प्रत्यक्षात उपस्थित नव्हता,त्यामुळे डॉक्टरांना शंका आली.त्यांनी शुभम तरटे हा व्यक्ती कोठे आहे,अशी विचारणा केली असता, यादव उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला.
यामुळे डॉ.गाढे यांनी तत्काळ त्यांच्या इतर सहकाऱ्यांना दालनात बोलून घेतले. रुग्णालयाने या दोघांनाही पोलिसांच्या हवाली केल्यानंतर शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला.अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहे.