अहमदनगर (दि.१९ जानेवारी):-अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्या वतीने ७० वी वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा शहरातील जिल्हा क्रीडा संकुल वाडिया पार्क येथे आयोजित केली आहे.
२७ ते ३० डिसेंबर या कालावधीत आयोजित केलेली ७० वी महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गट पुरुष/महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा सर्व स्थान वेगळी ठरली होती आणि ही अजिंक्य स्पर्धा प्रथमच मॅटवर खेळवण्यात आली होती.या चाचणी स्पर्धेला यश मिळाल्याने आता संघटनेने दि.२० मार्च ते २४ मार्च २०२४ पर्यंत ७० वी वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे,अशी माहिती संघटनेचे अजीवन अध्यक्ष दादाभाऊ कळमकर व सेक्रेटरी प्रा.शशिकांत गाडे सर यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी दादाभाऊ कळमकर यांनी स्पर्धेचे नियोजन कसे असेल याबाबत माहिती दिली.
या स्पर्धेसाठी ३२ राज्यांचे संघ उपस्थित राहणार आहेत,यामध्ये ४५० खेळाडू/संघ व्यवस्थापक/संघ प्रशिक्षक/१०० पंच/पदाधिकारी/१५० स्वयंसेवक/राज्य प्रतिनिधी व इतर असे एकूण ७०० जण सहभागी होणार आहेत या सर्वांची निवास व भोजन व्यवस्था आयोजकांमार्फत केलेली आहे.संघटनेचे सेक्रेटरी प्रा. शशिकांत गाडे सर म्हणाले की या स्पर्धेतून निवडलेला भारतीय कबड्डी संघ पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धा मध्ये सहभागी होणार आहे.तसेच या स्पर्धेत अनेक नामवंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे तसेच प्रो कबड्डी मधील खेळाडू आपापल्या राज्यांतर्फे सहभागी होणार आहे.या उच्च दर्जाच्या खेळाडूंचा खेळ प्रत्यक्ष बघण्याची सुवर्णसंधी नगरकरांना होतकरू खेळाडूंना उपलब्ध होणार आहे या स्पर्धेचा आवाका बघता खर्चही मोठा येणार आहे त्याची तरतूद करण्यासाठी जिल्ह्यातील खासदार आमदार सर्व लोकप्रतिनिधी महानगरपालिका जिल्हा परिषद आणि इतर क्रीडा प्रेमी व दानशूर व्यक्ती सर्वतोपरी मदत करणार आहे.तसेच १० हजार प्रेक्षक बसतील अशी आसन व्यवस्था करणार आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या विजेत्या संघास सव्वा किलो चांदीचा करंडक देण्यात येणार असल्याची माहिती गाडे सर यांनी दिली.या पत्रकार परिषदेला जिल्हा हौशी कबड्डी संघटनेचे अजीवन अध्यक्ष दादाभाऊ कळमकर,सेक्रेटरी प्रा.शशिकांत गाडे,विजय मिस्किन,जयंत वाघ,गोविंद भुजबळ,बाळासाहेब कडूस, कैलास पवार,शंतनु पांडव,विनायक भुतकर, प्रकाश बोरुडे इ.उपस्थित होते.