
संगमनेर (राजेंद्र मेढे):-अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याचा मुहुर्त साधून महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सोमवारी उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले.
यापूर्वी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते.त्यानंतर उजव्या कालव्याची चाचणी झाली.८४ किलोमीटर असलेल्या उजव्या कालव्याचा अकोले, संगमनेर आणि राहुरी तालुक्यातील ६९ गावांना याचा लाभ होणार आहे.यावेळी दीड टीमसी पाणी सोडण्यात येणार आहे.यावेळी महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले,अनेक वर्षे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागला. पण आता पाण्याची प्रतिक्षा संपली आहे.
डाव्या कालव्या प्रमाणेच उजव्या कालव्याला पाणी मिळाल्याने दोन्ही कालव्यावरील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,ज्येष्ठनेते माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या पुढाकाराने वरच्या भागातील कालव्यांच्या कामांना सुरूवात झाल्यामुळेच पाणी शेवटच्या गावाला मिळण्यात यश आले असल्याचेही विखे पाटील म्हणाले.