
अहमदनगर (२२ जानेवारी):-मराठा आरक्षणासाठी सुरू असलेला लढा आता अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथून मुंबईतील आझाद मैदानापर्यंत मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोहोचणार आहे.एक मराठा,लाख मराठा,जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत,मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत असंख्य मराठा समाजबांधव महिला,युवकांनी आज साेमवार दि. २२ जानेवारी सकाळी अहमदनगरमधून मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले.
मनोज जरांगे पाटील यांनी अहमदनगर शहरातील मार्केटयार्ड समोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर व बसस्टँड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या सोबत मराठ्यांचे हे वादळ मुंबईकडे रवाना झाले आहे.
नगरमध्ये या पदयात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले व त्यांच्या भोजनाची व्यवस्था ही करण्यात आली होती.पदयात्रेच्या मार्गावर कोणतीही गैरसोय होऊ नये,यासाठी ठिकठिकाणी पाेलिसांचा माेठा फाैजफाटा यावेळी तैनात हाेता.