घरकुलांसाठी पारधी समाजाचा वतीने १० जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह
अहमदनगर प्रतिनिधी (दि.२९. डिसेंबर):-अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आदिवासी पारधी समाजाची लोकवस्ती असुन आजही अन्न,वस्त्र,निवारा,शिक्षण, आरोग्य, रोजगार या मुलभूत गरजांपासुन पारधी समाज आजही वंचित असुन आदिवासी पारधी समाजातील लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा यांसह अन्य मागण्यांसाठी १० जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आणि आमरण उपोषण करणार असल्याची माहिती लोकशिक्षण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद काळे यांनी दिली.याबाबत बोलताना काळे म्हणाले की श्रीगोंदा तालुक्यासाठी लक्षांक वाढवून देण्यात यावा,न्युक्लिअस बजेट योजनेमध्ये निवड झालेल्या पारधी समाजातील लाभार्थ्यांना एक महिन्याची वाढिव मुदत मिळावी,पारधी विकास आराखडा योजनेतून मुलांचे शिक्षण व पारधी समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी नीधीचा उपयोग व्हावा,विविध कार्यकारी सोसायट्यांकडून सभासद करून घेण्यासाठी व कर्ज वाटप करताना पारधी समाजाची केली जाणारी पिळवणूक थांबवावी,पारधी समाजावर चुकीच्या पद्धतीने केली जाणारी मोक्का व तडीपारीची कारवाई थांबवावी तसेच पशुसंवर्धन विभागाच्या नाविण्यपूर्ण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी या मागण्यांसाठी संविधान मार्गाने सत्याग्रह करणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिल्याचे काळे यांनी सांगितले.यावेळी लोकशिक्षण प्रतिष्ठानच्या जयश्री काळे,विजय भोसले, दिगंबर काळे, गोपीचंद काळे,मनेष भोसले, एकनाथ काळे, आनंद काळे, योगिता काळे,साधना काळे,जावेद भोसले, दिनेश भोसले,राणी भोसले आदी उपस्थित होते.