कर्जत प्रतिनिधी:-अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना पिंपळवंडी येथे गेली १६ वर्षांपासून विविध आजाराच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरचे (मुन्नाभाई) चे बिंग फुटले असून त्यावर आरोग्य पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे.
रोबीन सौराद बिश्वास (५४,रा. सलुधारी,कच्चा रस्ता,पोष्ट मामाभाणगे,ता.बागदा, बिहार,हल्ली रा.पिंपळवाडी कर्जत) असे गुन्हा दाखल झालेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे.पंचायत समितीचे आरोग्य विस्तार अधिकारी व शासकीय बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीचे सदस्य मारुती मच्छिंद्र जाधव यांनी त्याच्या विरुद्ध कर्जत पोलिसांत तक्रार दिली होती त्या नुसार महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीशन अॅक्ट १९६१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पथकाने दिलेली अधिक माहिती अशी,कर्जतचे बोगस डॉक्टर शोध समितीचे अध्यक्ष तथा गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे,पंच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.दिलीप व्हरकटे, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुभाष शिंदे यांनी गुरूवारी (दि.८) सकाळी पिंपळवंडी येथे छापा टाकला. यावेळी त्यांना सय्यदभाई शेख यांच्या राहत्या घराच्या शेजारी एका पत्र्याच्या खोलीमध्ये एक टेबल, समोर दोन खुर्च्छा, दोन कॉट ठेवलेले व टेबल जवळील खुर्चीवर अशा प्रकारे दवाखाना थाटल्याचे आढळून आले.
रोबीन बिश्वास याने २००८ सालापासून वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे सांगितले. पथकाने त्यास वैद्यकीय व्यवसाय करण्याचे प्रमाणपत्र व डीग्रीची मागणी केली असता त्याने माझ्याकडे आता वैद्यकिय व्यवसायाचे कोणतेही प्रमाणपत्र व डीग्री नाही असे सांगितले.कर्जत तालुक्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी युवक क्रांती दल, कर्जत तालुका यांच्यावतीने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप व्हरकटे यांच्याकडे ५ ऑक्टोबर २०२३ रोजी निवेदन देऊन केली होती.