६५ व्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने पोलिस परेड मैदानावर ध्वजवंदनाचा सोहळा संपन्न;राज्याला पुन्हा प्रगतीच्या दिशेने नेण्याचा संकल्प करुयात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
नगर (दि.२ प्रतिनिधी):-राज्याला पुन्हा प्रगतीच्या दिशेने नेण्याचा संकल्प करुयात असा संदेश महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.६५ व्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने पोलिस परेड मैदानावर ध्वजवंदनाचा सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी जिल्हाधिकारी सिध्दराम सालिमठ,पोलिस अधिक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी आधिकारी आशिष येरेकर,महापालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांच्यासह जेष्ठ नागरीक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.मंत्री विखे पाटील यांनी पोलिस पथकाच्या संचलनाची पाहाणी करुन, मानवंदना स्विकारली.
याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, महाराष्ट्राने नेहमीच सर्व जाती,धर्म,पंथ यांना सामावून घेत एकसंघपणे वाटचाल केली आहे. राज्याच्या भूमीने स्वातंत्र्य संग्रामातही मोठे योगदान दिले.सामाजिक क्रांतीच्या विचाराने नेहमीच एकतेचा विचार घेवून वाटचाल करणा-या राज्याने संत विचारांचे अधिष्ठान कायम ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याची अर्थव्यवस्था कृषि आणि सहकारावर अवलंबुन आहे.यामुळे सामाजिक परिवर्तनात मोठी क्रांती झाली.स्व.यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला विकासाचा मंगल कलश आणतांना सर्वांना समान संधी उपलब्ध करुन दिल्या. त्यानुसार राज्याची वाटचाल सुरु असल्याचे ना.विखे पाटील म्हणाले.