Maharashtra247

खा.डॉ.सुजय विखेंची पात्रता विचारणाऱ्यां आ.थोरातांनी स्वत:च्या कामाचे मुल्यमापन करावे देशमुख

नगर (दि.२ प्रतिनिधी)-:”महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या पात्रतेवर भाष्य करणाऱ्या आमदार बाळासाहेब थोरातांनी आधी स्वत:च्या कामाचे मुल्यमापन करावे.पक्षाने आपल्याला राज्याचे नेतृत्व करण्याची संधी दिल्यानंतरही आपण किती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना न्याय देण्यास पात्र ठरलात? ” असा सडेतोड सवाल भाजपाचे नेते विनायक देशमुख यांनी विचारला आहे.

विनायक देशमुख म्हणाले की,थोरातांनी कॉंग्रेसमध्ये राहून आपल्या सर्व निष्ठा शरद पवारां प्रती वाहिल्या.बाळासाहेब थोरातांच्या पक्षातील वागणुकीमुळेच माझ्यासह उत्तर महाराष्ट्रील माजी खासदार आणि प्रदेश उपाध्यक्ष डॉ.उल्हास पाटील,प्रदेश सरचिटणीस उत्कर्षा रुपवते, नाशिक ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे, धुळे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष श्याम सनेर,नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे,प्रदेश सचिव डी.जी. पाटील,प्रदेश प्रवक्ते डॉ.राजू वाघमारे यांनी राजनामे देऊन पक्ष सोडला.यावर थोरातांनी आधी आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे.

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप करतानाही भिवंडी,सांगली,मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रातील नगर,नाशिक व जळगाव या जिल्ह्यांमध्ये कॉंग्रेस पक्षाला एकही जागा घेता आली नाही.याकडे लक्ष वेधून विनायक देशमुख म्हणाले की, “सर्व काही माझ्या नात्यागोत्या मध्येच मिळाले पाहिजे!”, हीच भूमिका आमदार थोरातांची वर्षानुवर्षे राहिली.नाशिक पदवीधर निवडणुकीतही महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील या उभ्या असतानाही या मतदार संघातून अपक्ष उमेदवार आणि आमदार थोरांतांचे भाचे सत्यजीत तांबे यांचा विजय होतो ही विशेष व गंभीर बाब आहे.थोरात यांची भूमिका ही नेहमीच शरद पवारांच्या भूमिकेला समर्थन देणारीच राहिली. थोरांताकडे कॉंग्रेसचे राज्याचे नेतृत्व असतानाही पक्षाला न्याय देण्यास किती पात्र ठरले, हाच प्रश्न आता उपस्थित होतो. दुसऱ्यांच्या पात्रतेवर भाष्य करताना थोरात स्वत: पक्षामध्ये कर्तृत्व सिद्ध करण्यास किती पात्र ठरले ? असा सरळ सवाल त्यांनी थोरातांना केला.

कॉग्रेस मधील अशा आत्मकेंद्रित नेतृत्वामुळे जिल्ह्या जिल्ह्यातील कॉग्रेस कार्यकर्त्यांच्या मनामध्ये प्रचंड अस्वस्थता असुन या निवडणुकीत त्यांचा स्फोट होईल,”असे दावा श्री.विनायक देशमुख यांनी केला आहे.

You cannot copy content of this page