Maharashtra247

कॉ.आबासाहेब काकडे हे तत्वनिष्ठ राजकारणी होते प्रा.डॉ.सुधाकर शेलार

अहमदनगर (दि.२ मे):- शेवगावचे अॅड.डॉ. विद्याधर उर्फ शिवाजीराव काकडे लिखित ‘आबासाहेब आणि मी’ या चरित्र ग्रंथाच्या व्दितीय आवृत्तीचे प्रकाशन समारंभ एन. एन.सध्या कॉलेज ऑफ फार्मसी,अहमदनगर या ठिकाणी प्रा.डॉ. सुधाकर शेलार यांचे हस्ते झाला.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक व विनोदी वक्ते डॉ. संजय कळमकर हे होते. व्यासपिठावर प्रमुख पाहुणे माजी कुलगुरु डॉ. सर्जेराव निमसे, अहमदनगर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. एम. बी. मेहता, या ग्रंथाचे लेखक अॅड. डॉ. विद्याधर काकडे तसेच जिल्हा परिषद सदस्या सौ. हर्षदाताई काकडे व श्री. अनंत कुलकर्णी हे उपस्थित होते.

ग्रंथाचे प्रकाशन अहमदनगर महाविद्यालयाचे मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ. सुधाकर शेलार यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलतांना श्री. शेलार म्हणाले की, ‘या पुस्तकाचे वाचन करतांना मला आबासाहेबांच्या व लेखक शिवाजीराव काकडे यांच्या नात्याची वीण समजत गेली. कॉ. आबासाहेब काकडे यांचे व्यक्तिमत्व समजले. आबासाहेब हे राजकारणासाठी राजकारण करणारे नव्हते. तर ते समाजकारणासाठी राजकारण करणारे होते. हे पुस्तक म्हणजे आबासाहेबांच्या कालखंडातील सामाजिक परिस्थितीचा दस्तऐवज आहे. त्यावेळी राजकारणात तत्वनिष्ठता पाळली जात असे. आबासाहेबांनी शेतकरी कामगार पक्षाचे नेतृत्व केले व सतत कॉग्रेसला विरोध केला आणि समाजासाठी तत्वनिष्ठ राजकारण केले. आबासाहेब हे राजकारणातील व समाजकारणातील प्रतिभावंत होते. हे पुस्तक अत्यंत वास्तवदर्शी माहिती देते. आबासाहेबांनी शेवगावला शाहिरी विद्यापीठ व्हावे, यासाठी प्रयत्न केले. पाणी प्रश्न सोडविण्यासाठी संघर्ष केला. या पुस्तकात कॉ. आबासाहेब काकडे व लेखक शिवाजीराव काकडे यांच्या चरित्रांचा समावेश आहे. हे पुस्तक तत्कालिन सामाजिक व राजकीय परिस्थितीचा व बहुजनांच्या जीवनाचा दस्तऐवज आहे’, अशा प्रकारची समीक्षा त्यांनी केली व हे पुस्तक सर्वांनी वाचावे असे सांगितलेकार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांनी आपल्या विनोदी शैलीतून सध्याचे राजकीय परिस्थिती व कॉ. आबासाहेबांच्या काळातील राजकीय परिस्थिती यांची तुलना सांगितली.

त्यावेळी ते म्हणाले की, ‘पुस्तकाचे लेखक अॅड. शिवाजीराव काकडे यांना लेखक म्हणवून घेण्याची हौस नाही, परंतु आपल्या वडिलांचे कार्य त्यांनी समाजापुढे आणण्यासाठी हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात सामाजिक मूल्ये आहेत. आपल्या जिल्हयातील अनेकांना या पुस्तकामुळे आबासाहेबांच्या कार्याचा परिचय झाला. हेच या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचे यश आहे. तत्कालिन परिस्थितीत बहुजनांनी, शेतक-यांनी आपले खर्च कमी करावेत. बडेजाव न करता साधेपणाने विवाह समारंभ करावे. खोटया प्रतिष्ठेपायी बहुजन समाजाचे नुकसान होते, म्हणून आबासाहेबांनी समाजजागृतीचे काम केले. या सर्व बाबींचा उल्लेख लेखकाने तटस्थपणे केला आहे. हे पुस्तक वाचतांना तत्कालिन वास्तव डोळयासमोर येते. लेखक डॉ. शिवाजीराव काकडे यांनी आपल्या मनोगतातून पुस्तक लिहिण्यामागची प्रेरणा सांगितली. या साहित्यकृतीची उपयुक्तता पुढील पिढीसाठी व्हावी, असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजन समितीचे प्रमुख संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. लक्ष्मणराव बिटाळ यांनी केले. तर मान्यवरांचे स्वागत लेखक डॉ. शिवाजीराव काकडे यांनी केले. आभारप्रदर्शन राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. जगन्नाथ बोडखे यांनी केले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदाताई काकडे उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री. गोविंद वाणी यांनी केले.

कार्यक्रमप्रसंगी अॅड. सुभाषराव भोर, डॉ. एम.बी. मेहता, डॉ. नामदेव पंडीत, डॉ. राहुल मुथ्था, सेवानिवृत्त अभियंता हरिभाऊ बोडखे, जिल्हा परिषदेचे अभियंता श्री. रमेश शिदोरे, इंजिनियर श्री. सुधाकर मिसाळ, श्री. सुनिल कात्रे, श्री. संजय डोंगरे, श्री. विजूभाऊ परदेशी, प्राचार्य डॉ. विशाल पांडे, प्राचार्य डॉ. मच्छिंद्र फसले, श्री. विकास गवळी तसेच आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहातील विविध शाखांचे प्राचार्य, उपप्राचार्य, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व राष्ट्रीय पाठशाळाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, एन. एन. सथ्था कॉलेज ऑफ फार्मसी व जनशक्ती ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक व कर्मचारी यांसह नगर शहरातील प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते

You cannot copy content of this page