
नगर (प्रतिनिधी):-जैन समाजाला मदत करणाऱ्या नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाला 13 मे रोजी मतदान करा असे आवाहन जैन मंदिराचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे उपाध्यक्ष सुभाष मुथा यांनी केले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, सकल जैन समाज, राजस्थानी समाज, व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा अधिकार बजावत लोकशाहीचा उत्सव साजरा करावा.
देशात सध्या लोकशाहीच्या लोकसभा निवडणुकीचा महाउत्सव सुरू आहे. लोकभेची निवडणूक ही गल्ली बोळातील निवडणूक नसून देशाचा नेता ठरवणारी निवडणूक आहे. मागील १० वर्षात देशाचे नेते पंतप्रधान मोदी यांच्या काळात देशाला जगात प्रतिष्ठा मिळाली. तसेच देशातील प्रत्येक घटकाचा विकास करून त्यांनी नवा भारत निर्माण केला. व्यापाऱ्यांना आतापर्यंत विकासाच्या सर्वाधिक संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपलब्ध केल्या यामुळे देशात अनेक तरूण व्यापारी निर्माण झाले. त्यांच्या इतका प्रभावी नेता देशात नाही. यामुळे देशाला अधिक मजबूत करण्यासाठी देशाची धुरा त्यांच्या हाती देणे गरजेचे आहे. त्यासाठी भाजप आणि महायुतीच्या उमेदवाला निवडून देणे ही आपली जबाबदारी असल्याचे मुथा यांनी सांगितले.
नगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे पाटील आहेत. ते उच्च शिक्षित आणि विकासाचे व्हिजन असणारे आहेत. त्यांच्या मार्फत नरेंद्र मोदी यांना आपल्याला पंतप्रधान करता येणार आहे. यामुळे सकल जैन समाज, राजस्थानी समाज तसेच नगरमधील व्यापारी वर्गाने देशहित, समाजहित लक्षात घेता सोमवार दि.13 मे 2024 रोजी आवर्जून मतदानाचा हक्क बजावत विकासासाठी भाजपला मतदान करावे असे सांगितले.
सुभाष मुथा म्हणाले की, नगर शहरात तसेच नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात जैन समाज मोठ्या प्रमाणावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दित जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळाल्याने जैन समाजासाठी अनेक सवलती मिळाल्या त्याचा लाभ जैन समाजातील युवा वर्गाला होत आहे.
देशातील काही पवित्र जैन तीर्थस्थळे गिळंकृत करण्याचा प्रयत्न काही समाजविघातक प्रवृत्तींनी चालवला आहे. त्याला पायबंद घालण्याची ताकद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे. ते निश्चितच आपल्या पवित्र जैन तीर्थस्थळांचा वारसा जतन करतील असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
पद्मभूषण जैनाचार्य परमपूज्य रत्नसुंदर सुरीश्वरजी महाराजा साहेब हे कोविडच्या सुरुवातीला मुंबईत होते. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून त्यांच्याशी संपर्क साधून गोचरी पाण्याची (अन्नपाण्याची) व्यवस्था नीट आहे का? वैद्यकीय सुविधांची काही कमतरता नाही ना ? याची आवर्जून आपुलकीने विचारपूस केली होती. अयोध्या येथे जैन तीर्थक्षेत्र(मंदिर)साठी मोक्याच्या ठिकाणी 5 एकर जागा व तीर्थक्षेत्र, मंदिर उभारणीसाठी निधीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे.
मुंबईतील किंग्ज सर्कल रेल्वे स्टेशनला जैन तीर्थंकर पार्श्वनाथ भगवान यांचे नाव देण्याचा निर्णयही पंतप्रधान मोदींनी घेतला. साधूसाध्वीजी जेव्हा पायी अनवाणी विहार करतात तेव्हा त्यांना अनेकदा त्रास होतो, अपघात होतात. ही बाब लक्षात घेऊन भाजप सरकारने संपूर्ण देशभरात विहार करणाऱ्या साधूसाध्वीजींना पोलिस संरक्षण देण्याचे आदेश जारी केले. असे जैन समाजासाठी, जैन धर्मासाठी अनेक चांगले निर्णय मोदी सरकारच्या काळात झाले आहेत. अशी कामे यापूर्वी 60 वर्षाच्या काळात कोणत्याही इतर पक्षाच्या सरकारने केली नव्हती.भाजप सरकारनेच केंद्रात जैन समाजाच्या खासदाराला मंत्रीपद देवून समाजाला न्याय दिला होता. त्यामुळे सध्या नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशाला अन्य पर्याय नाही.
त्यामुळे मतदानाच्या दिवशी सकाळीच सगळ्यांनीच आपल्या कुटुंबियांसह लवकर मतदानाचा हक्क बजावावा. नंतरच दुकाने उघडण्यासाठी जावे. आपले मतदानाचे कर्तव्य बजावून नंतर उद्योग, व्यवसायाकडे वळावे असे आवाहन सुभाष मुथा यांनी केले.