पाटात सापडले तरुणाचे मृतदेहाचे तुकडे;एका गोणीत धड आणि डोके… जिल्ह्यातील घटना
अहमदनगर (दि.१८ मे):-अहमदनगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यातील देडगाव येथून पाथर्डीकडे जात असलेल्या मुळा धरणाच्या कालव्यात एका अज्ञात युवकाच्या शरीराचे आठ ते नऊ तुकडे कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नेवासा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन कालव्यात विखुरलेले सर्व तुकडे ताब्यात घेतले आहेत. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमा झाली होती.सरपंच चंद्रकांत मुगंसे यांना घटनेची माहिती समजताच त्यांनी पोलीस पाटील प्रल्हाद ससाणे यांना सांगितले. सुरुवातीला कालव्यात हाताचा तुकडा पाण्यात तरंगलेला दिसत होता. पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व पथकाला घटनास्थळी रवाना केले.
पंचासमक्ष हाताचा तुकडा काढल्यानंतर पुर्व दिशेला पाय,हात व शरीराचे दोन तुकडे सापडले. तसेच एका गोणीत धड व डोके सापडले.अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कल्लबर्मे,शेवगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनिल पाटील यांनी भेट देऊन तपासाबाबत पथकाला मार्गदर्शन केले. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात भा.दं वि.कलम ३०२, २०१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.