Maharashtra247

जिल्हा प्रशासनाकडून जागतिक बाल कामगार दिनानिमित्त शहरामध्ये जनजागृती

अहमदनगर (दि.१३ जुन प्रतिनिधी):-सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर शहरात जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्ताने जनजागृती करण्यात आली.बालमजुरी ही एक अनिष्ट प्रथा असून ती सामाजिक,सांस्कृतिक समस्यांवर निगडित असल्यामुळे जनजागृती होणे आवश्यक आहे.

त्यासाठी दरवर्षी 12 जून जागतिक बालकामगार विरोधी दिन म्हणून देशभरात पाळला जातो. शहरातील सर्व दुकानें, गॅरेज,हॉटेल आस्थापनाधारकांना व उद्योजकांना बाल व किशोरवयीन कामगारांना कामावर ठेऊ नये. बालमजुरीमुळे मुलांचा शाळेत जाण्याचा हक्क हिरावला जातो आणि ते आंतरपिढीच्या गरिबीच्या चक्रातून सुटू शकत नाहीत.बालमजुरी हा शिक्षणातील मोठा अडथळा आहे,ज्यामुळे मुलांच्या शाळेतील उपस्थिती आणि कामगिरीवर विपरित परिणाम होतो.असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातुन स्वभेट देऊन करण्यात आले.

यावेळी आस्थापनाधारक यांच्याकडून बालकामगार कामावर ठेवण्यात येणार नाहीत असे हमीपत्र घेण्यात आले.तसेच जागोजागी बालकामगार मोहीमेबाबत जनजागृतीच्या दृष्टीने स्टिकर्स लावण्यात आले, परिपत्रके वाटण्यात आली.यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त श्री. नितिन केवले,श्रीमती. शितल बांदल परिविक्षाधिन सहाय्यक कामगार आयुक्त,श्री.तुषार बोरसे,सरकारी कामगार अधिकारी,श्रीमती सोनल काटकर, श्रीमती प्रगती पिसे परिविक्षाधिन सरकारी कामगार अधिकारी श्री. अंबादास केदार, श्री.प्रकाश भोसले, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी श्री.वैभव देशमुख,चाईल्डहेल्प लाईन युनिटचे श्री.महेश सूर्यवंशी व सर्व सहकारी यांनी परिश्रम घेतले.

अल्पवयीन मुलांना कामावर ठेवणे गुन्हा आहे.14 वर्षाखालील अल्पवयीन मुलांना कोणत्याही प्रकारच्या मजुरीसाठी कामावर ठेवणे हा गुन्हा आहे ज्यासाठी जास्तीत जास्त 2 वर्षांचा तुरुंगवास, 50 हजारापर्यंत दंड आहे. 14 ते 18 वयोगटातील किशोरांना कोणत्याही धोकादायक उदयोगधंदयांमध्ये काम कायदयान्वये मनाई आहे.

You cannot copy content of this page