Maharashtra247

सिताराम सारडा विद्यालयात तब्बल ३९ वर्षांनी  दहावीच्या १९८५ च्या बॅचचे विद्यार्थी आले एकत्र धमाल मस्ती करत जुन्या आठवणींना दिला उजाळा;गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिली ३९ हजार रुपयांची देणगी

नगर (दि.१८ जुन प्रतिनिधी):-शाळेची घंटा वाजली आणि विद्यार्थी वर्गात पोहचले.त्यांच्या हातात लगेचच इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका देण्यात आली.सगळेच टेन्शनमध्ये आले.एकमेकांकडे पाहू लागले पण काही वेळातच विद्यार्थ्यांनी पेपरचे तुकडे करून त्याचे विमान बनवले कोणी होडी तयार केली आणि वर्गात एकच गलका झाला.सगळेच धमाल मस्ती करीत एकमेकांना चिडवत आनंद लुटत होते.हे चित्र होतं हिंद सेवा मंडळाच्या सिताराम सारडा विद्यालयात.निमित्त होते तब्बल ३९ वर्षांनी एकत्र आलेल्या १९८५ च्या दहावीच्या बॅचच्या स्नेहमेळाव्याचे.या माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकत्र येत शालेय दशेतील गोड आठवणींना उजाळा देत जुन्या सवंगड्यांशी हृदय संवाद साधला.यावेळी सुरुवातीला राष्ट्रगीत व चंद्रकांत वऱ्हाडे सरांच्या मार्गदर्शनाखाली पी.टी.चा क्लासही झाला.अवघ्या सहा महिन्यांपूर्वी एकमेकांशी पुन्हा संपर्क झाल्यावर सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेतच स्नेहमेळावा घेण्याचं नियोजन केले.

नोकरी व्यवसायानिमित्त नगर बाहेर स्थायिक झालेले माजी विद्यार्थीही उत्साहात कार्यक्रमास आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेच्या प्राथमिक विभागाचे अध्यक्ष मधुसूदन सारडा यांनी भूषविले.तसेच शिक्षक गुलाबबाई बोगावत,अरूणा गांधी, विद्या भालेराव,शांभवी जोशी,दादासाहेब पाटोळे,हबु शिंदे, चंद्रकांत वऱ्हाडे,रंगनाथ कसबे,विष्णुपंत बडवे, अशोक कापरे,विठ्ठल उरमुडे,अशोक डोळस, गोवर्धन पांडुळे,सुजाता खामकर आवर्जून उपस्थित होते.मधुसुदन सारडा म्हणाले,शालेय जीवन हे प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाचे असते.शाळेत झालेली जडणघडण,मिळालेले मित्र,मैत्रीणी आयुष्यात आनंद फुलवतात.१९८५ च्या दहावीच्या बॅचचे विद्यार्थी पुन्हा एकत्र आलेले पाहून आनंद झाला.त्यांच्यामुळे आम्हालाही आमच्या शालेय जीवनाची आठवण झाली. माध्यमिक विभागाचे अध्यक्ष शिरीष मोडक, मधुसुदन मुळे यांनी ऑनलाईन सहभाग नोंदवत सर्व माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. आयुष्यात मोठी झेप घेतलेले कर्तृत्ववान विद्यार्थी शाळेची आवर्जून आठवण ठेवतात तेव्हा मनापासून आनंद होतो असे ते म्हणाले.शाळेच्या आठवणी म्हणून सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गात वेळेवर हजर राहण्यासाठी घंटा वाजवून वर्ग भरविला व इंग्रजीचा पेपर म्हणून प्रश्नपत्रिका वाटल्या. नंतर गंमत जंमत म्हणून अक्षरश:त्याचे विमान, होड्या,पंखे,खारेमुरेचे पाकीट बनवून लहान झाल्याचा आनंद लुटला.

जुन्या आठवणींना उजाळ देवून सर्वांचा परिचय व मनोगत व्यक्त केले.त्याकाळची आठवण म्हणून वर्गात लेमन गोळ्या,रावळगाव चॉकलेट वाटण्यात आले. स्नेहमेळाव्यास इटारसी, मुंबई,परळी,पुणे,अहमदनगर,नाशिक व इतर शहरातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थींनींची उपस्थिती होती. शाळेच्या गणवेशाचा सेल्फी स्टॅण्ड बनवून सर्वांनी फोटो सेशन केले. स्नेहमेळाव्या प्रसंगी सर्वांना एक एक वृक्ष देण्यात आले.यासाठी वृक्षमित्र गोरक्षनाथ गवते व मोरे यांचे विशेष सहकार्य लाभले. सर्व मुले-मुली ३९ वर्षांनी एकत्र येवून हा स्नेहमेळावा साजरा केला त्याबद्दल शाळेस कृतज्ञता म्हणून गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ३९ हजार रुपयांची देणगी देण्यात आली.माजी विद्यार्थी दादासाहेब दुसुंगे (मुख्याध्यापक, कापुरवाडी शाळा), संजय लोहकरे,विश्वनाथ खुळे,बाळासाहेब पवार हे वरिष्ठ पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

तसेच विद्यार्थी वकिल, इंजिनिअर,व्यापारी अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.या स्नेहमेळाव्याचे संपूर्ण नियोजन गणेश बंग यांनी केले.त्यांना सुवर्णा शेटे,अजय दिघे, राजेश बजाज,शाम बंग, संजय डहाळे,प्रशांत धोत्रे,प्रकाश बागल, साईनाथ दुधाले,संतोष मायनाळे यांनी विशेष साथ दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगिता शहापुरे (गुरव) यांनी केले.सुवर्णा ढेरे (शेटे) यांनी आभार प्रदर्शन केले.गणेश बंग यांचे मित्र संतोष वन्नम (डिझाईन), प्रमोद गांधी (अनामिका पब्लिसिटी),प्रकाश बल्लाळ (ट्रॉफी),अमोल (फोटोग्राफर) गोटु महाराज (केटरिंग) यांचे सहकार्य लाभले. शाळेकडून कार्यक्रम पार पाडण्यास गोवर्धन पांडुळे व इतर स्टाफकडून विशेष सहकार्य लाभले.कार्यक्रमास येवू न शकलेले शिक्षक अरविंद धर्माधिकारी, गोपालकृष्ण सुवर्णपाठकी,व्यापारी सर,माणिक दसरे, वैशाली रेखी यांचा घरी जावून सन्मान करण्यात आला.

You cannot copy content of this page