महत्वाची बातमी….जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी नागरिकांना केले ‘हे’ आवाहन
अहमदनगर (दि.२१ जुन प्रतिनिधी):-जिल्ह्यातील सर्व अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांनी रेशन घेण्यासाठी आपल्या रास्तभाव दुकानातून ३० जुनपर्यंत ई-केवायसी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी अहमदनगर यांचे मार्फत करण्यात येत आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानामार्फत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना धान्याचे वितरण करण्यात येते.त्यानुसार शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील एकूण २९ लक्ष ३४ हजार ४८५ लाभार्थ्यांचे ई-केवायसी (आधार प्रमाणीकरण) करणे बंधनकारक आहे.
अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिकेसोबत संलग्न करण्यात आलेले आधार क्रमांक बरोबर असल्याचे तसेच शिधापत्रिकेमध्ये नमुद असलेल्या व्यक्ती त्याच आहेत याची खात्री करण्यासाठी ई-केवायसी प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्याव्दारे आधार क्रमांक संलग्न शिधापत्रिकेमध्ये नमुद योग्य व्यक्ती असल्याची खात्री होणार आहे.जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानामार्फत तेथील ई-पॉस मशिनद्वारे ई-केवायसी केली जाणार असल्याचेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.