कर्जदाराने तक्रार दाखल केली असता सावकाराने केला चाकू हल्ला
अहमदनगर (दि.१९ जुलै):-संगमनेर तालुक्यात साकूरजवळ बिरेवाडी येथील कर्जदाराने सहायक निबंधकांकडे तक्रार दाखल केल्याच्या रागातून सावकाराच्या चुलत भावाने कर्जदारावर वाहनाच्या चावीतील की-चैनमधील धारदार चाकूचे वार करीत ठार मारण्याचा प्रयत्न केला.त्याच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकीही त्याने दिली.
गुरुवारी दि.१८ जुलै रोजी ही घटना घडली.मुक्ताराम काशिनाथ सागर असे जखमीचे नाव आहे.मुक्ताराम सागर हे शेतकरी आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे,की गावात लालू नारायण ढेंबरे व त्यांचा मुलगा योगेश हे अवैध सावकारीचा व्यवसाय करतात.सागर यांनी ढेंबरे कडून काही दिवसांपूर्वी एक लाख रुपये व्याजाने घेतले होते.या रकमेचा आतापर्यंत तब्बल १२ लाख रुपयांचा परतावा केल्याचे आणि तसे पुरावे असल्याचे सागर यांचे म्हणणे आहे.
व्याजाने रक्कम घेतवेळी २० गुंठे जमीन गहाणखत करण्याच्या नावाखाली ढेंबरे यांनी खरेदीखत करून घेतली आहे. आणखी काही वाढीव रकमेसाठी ढेंबरे शिवीगाळ,मारहाण करीत सागर यांना पैशाचा तगादा करीत होते.शेवटी त्रासाला कंटाळून सागर यांनी संगमनेरातील उपनिबंधक कार्यालयात तक्रार केली होती.हे प्रकरण न्यायप्रवीष्ट आहे. मात्र ही तक्रार केल्याचा राग मनात ठेवून ढेंबरे यांनी भ्याड हल्ला केल्याचे सागर यांनी सांगितले.याप्रकरणी मुक्ताराम काशिनाथ सागर यांच्या फिर्यादीनुसार घारगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल आदिनाथ गांधले करीत आहेत.