बनावट सोने खरे असल्याचे भासवुन विक्री करण्याकरीता हॉटेलमध्ये बनावट आधारकार्ड देऊन मुक्काम ठोकणाऱ्या दोघा भामट्यास एलसीबीने ठोकल्या बेड्या
अहमदनगर (दि.२० जुलै):-शिर्डी येथील हॉटेलमध्ये बनावट आधारकार्ड देवुन मुक्कामी असलेले 2 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.बातमीची हकीगत अशी की,दि.१७ जुलै रोजी शिर्डी येथील हॉटेल टेम्पल ट्री या ठिकाणी 2 संशयीत इसम बनावट आधारकार्ड देवुन मुक्कामी थांबलेले होते. हॉटेल टेम्पल ट्री मधील मॅनेजर यांना आधारकार्ड बनावट असल्याचा संशय आल्याने त्यांनी शिर्डी पोलीस स्टेशन येथे तक्रारी अर्ज दिला होता.सदर तक्रारी अर्जाचे चौकशीमध्ये हॉटेल टेम्पल ट्री मध्ये थांबलेल्या 2 इसमांनी बनावट आधारकार्ड देवुन वास्तव्य केल्याचे निष्पन्न झाल्याने पोकॉ/1182 गणेश रघुनाथ घुले ने. शिर्डी पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिर्डी पो.स्टे.गु.र.नं. 422/2024 भारतीय न्याय संहिता सन 2023 चे कलम 336, 336 (2), 336 (3), 337, 340 (2) प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटना घडल्यानंतर 2 दहशतवादी/हल्लेखोर शिर्डीमध्ये येवुन राहिल्याची बातमी पसरल्याने शिर्डी परिसरातील हॉटेल व इतर व्यवसायीकांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले होते.सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना वर नमुद गुन्ह्यातील दोन्ही आरोपींचा शोध घेवुन त्यांना अटक करणे बाबत आदेशित केले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पथक नेमुन वर नमुद गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले होते.स्थागुशा पथकाने लागलीच शिर्डी येथील हॉटेल टेम्पल ट्री येथे जावुन सदर ठिकाणावरील तसेच हॉटेलच्या आजु बाजूचे सीसीटीव्ही फुटेज चेक करुन संशयीतांचे फोटो गुप्तबातमीदारांना प्रसारीत केले.
पथक गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असतांना पोनि/श्री.दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,प्रसारीत केलेल्या फोटोतील 2 संशयीत इसम हे काळ्या रंगाचे विना क्रमांकाचे महिंद्रा थार गाडीमधुन छत्रपती संभाजीनगर येथुन नेवाशाच्या दिशेने येत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन खात्री करुन आरोपी विरुध्द कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.पथकाने तात्काळ खडका फाटा, ता.नेवासा येथील टोल नाका येथे जावुन सापळा रचुन थांबलेले असतांना थोडाच वेळात काळ्या रंगाची विना क्रमांकाची थार गाडी येताना पथकास दिसली. पथकाने सदर गाडी थांबवण्याचा इशारा करताच संशयीतांनी ताब्यातील थार गाडी छत्रपती संभाजी नगरच्या दिशेने वळवुन पळुन जाण्याच्या तयारीत असतांना पथकाने त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे वसीम ताहीर शेख,रा. बिलोली,जिल्हा नांदेड व फिरोज रफीक शेख वय रा.सुतार गल्ली, बिलोली,जिल्हा नांदेड असे असल्याचे सांगितले.ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांकडे त्यांनी हॉटेल टेम्पल ट्री, शिर्डी येथे हॉटेल मधील रुम बुक करण्यासाठी दिलेले बनावट आधारकार्डच्या 2 झेरॉक्स मिळुन आल्या. वरील दोन्ही इसमांकडे हॉटेल टेम्पल ट्री,शिर्डी येथे बनावट आधारकार्ड देवुन रुम बुक करुन राहण्याचे कारणाबाबत विचारपुस करता दोन्ही संशयीत हे बनावट सोने आणुन शिर्डी परिसरातील नागरीकांशी ओळख करुन,नागरीकांचा विश्वास संपादन करुन त्यांचे कडे असलेले केमीकलचे आधारे बनावट सोने हे खरे असल्याचे भासवुन विक्री करणे करीता असल्याचे सांगितल्याने त्यांचे कडील बॅगची झडती घेतली असता विविध प्रकारचे रसायनांच्या बाटल्या,मोबाईल फोन व महिंद्रा कंपनीची थार असा एकुण 13 लाख 35,000 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपींना ताब्यात घेवुन शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.
शिर्डी या ठिकाणी बनावट आधारकार्ड देवुन संशयीतरित्या वास्तव्य करणारे आरोपींना खडका शिवार,ता. नेवासा येथुन अटक करण्यात आली असुन आरोपी हे दहशतवादी/हल्लेखोर नाहीत. आरोपी हे बनावट सोने खरे असल्याचे भासवुन विक्री करणे करीता आल्याचे निष्पन्न झाल्याने शिर्डी परिसरातील व जिल्ह्यातील नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवु नये असे अवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. राकेश ओला यांनी केले आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधिक्षक,श्रीरामपूर व श्री.शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी,शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/समाधान भाटेवाल तसेच अंमलदार दत्तात्रय गव्हाणे,रविंद्र कर्डीले, अतुल लोटके,देवेंद्र शेलार,संदीप दरंदले, फुरकान शेख,संतोष खैरे,आकाश काळे, सागर ससाणे,रोहित येमुल व संभाजी कोतकर वरील यांनी केलेली आहे.