अहमदनगर (दि.२ ऑगस्ट):-श्रीरामपूर येथील खुन प्रकरणातील एक आरोपी व १ विधीसंघर्षीत बालक १२ तासाच्या आत पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.बातमीची हकीगत अशी की,दि.२ ऑगस्ट रोजी घटनेतील फिर्यादी श्री.मुन्ना शेखनुर पठाण (रा.आदर्शनगर, ता.श्रीरामपूर) यांची आई श्रीमती.शम्मा पठाण (रा. वळदगांव,ता.श्रीरामपूर) यांचे घरात गावातील आकाश व त्याचा साथीदार यांनी प्रवेश केला व आकाश याने फिर्यादीचा भाचा साहिल यास ठार मारण्याच्या उद्देशाने कु-हाडीने वार करुन जखमी केले.
त्यावेळी फिर्यादीची आई त्यास सोडविण्यास मध्ये गेल्या असता त्यांच्या डोक्यात कु-हाडीने वार करुन जिवे ठार मारले व फिर्यादीची भाची महेक सय्यद हिचेवर कु-हाडीने वार करुन गंभीर जखमी केले बाबत श्रीरामपूर शहर पो.स्टे. येथे गु.र.नं. 774/2024 भारतीय न्याय संहिता कलम 103 (1),109, 333,3 (5), 332 (2) प्रमाणे खुनाचा व खुनाचे प्रयत्न असा गुन्हा दाखल झाला होता.सदरची घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन ताब्यात घेणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री.आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/हेमंत थोरात,पोहेकॉ/गणेश भिंगारदे,देवेंद्र शेलार,पोना/फुरकान शेख,पोकॉ/सागर ससाणे,रोहित येमुल, बाळासाहेब गुंजाळ, भाऊसाहेब काळे, चासफौ/उमाकांत गावडे व चापोहेकॉ/भरत बुधवंत अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेसह भोसले खाणीजवळ,वळदगांव येथे जावुन घटना ठिकाणास भेट देवुन घटना ठिकाणची बारकाईने पहाणी करुन, घटना ठिकाणचे व आजुबाजूचे लोकांकडे सदर घटना तसेच आरोपीं बाबत माहिती घेत असतांना पोनि/श्री. आहेर यांना यातील जखमी साहिल सय्यद याचे गांवातील मुलीशी प्रेमसंबंध असल्याचे संशयावरुन सदरची घटना घडल्याची माहिती मिळाल्याने पथकास गुन्ह्यातील आरोपी नामे आकाश व त्याचा साथीदार यांचा शोध घेवुन ताब्यात घेणे बाबत आवश्यक सुचना देवुन रवाना केले.
स्थागुशा पथकाने तात्काळ वळदगांव,ता.श्रीरामपूर परिसरात जावुन आरोपींचा शोध घेत असतांना पथकास गुप्तबातमीदारा मार्फत वर नमुद गुन्ह्यातील आरोपी आकाश बर्डे (रा. भोसले खाणी जवळ, वदळगांव, ता.श्रीरामपूर) असे असुन तो पढेगांव येथे व पढेगांव येथून रेल्वेने कोठे तरी पळुन जाण्याच्या तयारीत आहे.अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथक वळदगांव येथील भोसले खाणीकडे जात असतांना दोन इसम रस्त्याने पायी पढेगांव रोडने जाताना दिसले. पथक त्यांचे कडे जात असतांना ते अंधारात पळुन जावु लागले. पथकाने लागलीच त्यांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या संशयीतास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे आकाश इंद्रभान बर्डे (रा. भोसले खान,वळदगांव, ता.श्रीरामपूर) व विधीसंघर्षीत बालक वय १७ वर्षे असे असल्याचे सांगितले.त्याचे कडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता त्यांनी गांवातील मुलीशी प्रेमसंबंध असल्याचे संशयावरुन गुन्हा केल्याचे सांगितल्याने दोन्ही आरोपींना ताब्यात घेवुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर,श्री.वैभव कलुभर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर,डॉ. श्री.बसवराज शिवपुजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
