अहमदनगर (दि.१८ ऑगस्ट):-१८ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलीशी विवाह करणार नाही,असे वचन बहिणींनी भावांकडून रक्षाबंधन दिनानिमित्त आपल्या भावांकडून घ्यावे.त्यांनीही बहिणीचा विवाह तिच्या वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्या शिवाय होऊ देणार नाही, असा निर्धार करावा,असे आवाहन स्नेहलयाच्या बालविवाह प्रतिबंधक प्रकल्प (उडान) च्या संचालिका ॲड.बागेश्री जरंडीकर आणि श्री. हनिफ शेख यांनी आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाऊ बहिणींना केले आहे.
प्रेम,मैत्री,रुसवे फुगवे सर्वांचा परिपाक असललेलं गोड नातं म्हणजे बहीण भावाचं नातं. लहानपणापासून ते एकमेकांच्या सुख दुःखाचे,खेळण्यातले भागीदार असतात.म्हणूनच हे नाते सर्वात मजबूत मानले जाते.बहीण भावाच्या नात्याचं बंधन अतुट असतं.परतू इतकं गोड नात असलेल्या या नात्यात सुद्धा अनेक वेळा हेवे दावे एकमेकांवर वर्चस्व गाजवणारे प्रकार सुरू होतात.खरतर प्रत्येक नात्यांच्या काही जबाबदाऱ्या असतात. बहीण भावाच्या नात्यातही एकमेकांप्रती काही जबाबदाऱ्या आहेत त्या दोघांनाही निभावून न्यायच्या असतात. बहीण लहान असो वा मोठी खरे तर आईनंतर आपली सर्वांत जास्त काळजी घेणारी ही बहीणच असते.बहिण आपल्या भावाला प्रत्येक पावलावर साथ देते. पण अनेकवेळा काय होतं की, पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा नकळत या भावांच्या मनावर असतो आणि यातून जेव्हा बहिणीला भावाच्या मदतीची, एखाद्या निर्णयात सोबतीची गरज असते.तेव्हा या भावांचा पुरुषी स्वभाव आड येतो असे बहुतांश घरात दिसते.
अनेक भाऊ आपल्या बहिणीच्या इच्छेकडे लक्ष देत नाहीत. ज्या गोष्टींमध्ये तिला आनंद मिळतो त्याच गोष्टींकडे भाऊ दुर्लक्ष करतात. खरे तर, एक मुलगा या नात्याने तो ते काम उत्तमरित्या करू शकत असतो परंतु तो तसं करत नाही असे अनेकवेळा दिसून आले आहे. पण अनेक वेळा मुलींना १८ किंवा २१ वर्षाचा आत मध्ये स्वतःच्या इच्छेविरुद्ध विवाह करावा लागतो. अल्पवयीन वयात विवाह झाल्याने तिच्या जीवनात खूप संकटे आणि समस्यांचा जन्म होतो. मुलगी किंवा मुलगा वयात येण्यापूर्वीच हा म्हणजे बालविवाह हा बलात्कारापेक्षा कमी तर नाही पण तो सामाजिक आणि सर्व समाजमान्य बलात्कारच आहे.
भारतीय कायद्यांमध्ये सोळा वर्षाखालील मुलीशी संमतीने अथवा विना संमतीने शरीर संबंध ठेवल्यास त्याला बलात्कार मानले जाते हे माहिती असतानाही अठरा वर्षाखालील मुलीचे लग्न लावून देऊन अशाप्रकारे दंडनीय कृत्याला समाजाची मान्यताच असते. कायदे आहेत आणि होत जातील परंतु त्याची कठोरपणे अंमलबजावणी कधी होणार हा मात्र ज्वलंत प्रश्न आहे आणि पूर्ण समाजाने त्यावर विचार करून अशा प्रकारची बालविवाहाची कृती ताबडतोब थांबवणे अत्यंत आवश्यक आहे.
लहान वयात झालेल्या लग्नामुळे लैंगिक विषयी पुरेसे ज्ञान या मुलींना नसते त्यामुळे त्यांना कुटुंब नियोजन, गर्भधारणा आणि गर्भधारणा झालीच तर काय काळजी घ्यावी हे माहीत नसल्यामुळे ते त्यांचे बाळ पोटात किंवा जन्म झाल्यानंतर लगेच काही दिवसांनी त्यांना गमवावे लागते. कारण त्यांचे अपुरे पोषण सक्षम नसलेले शरीर बालविवाहात स्त्रियांवर आकारण मातृत्व लादले जाते. ज्या वयात शिक्षण घ्यायचे त्या वयात संसारात पडल्यामुळे मुली शिकू शकत नाही आणि हे तर सर्वसामान्य आहे की एक मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंब साक्षर होत. या पासूनही समाज अशा कृत्यामुळे वंचित राहतो. यामुळे समाजातून विद्या नाहीशी झाली. अकाली मातृत्वामुळे बालकांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढते.समज येण्यापूर्वीच लग्न होत असल्यामुळे, आई वडील शोधून देतील तशा अनोळखी पुरुषाबरोबर जीवन व्यतीत करणे भाग पडते. स्त्रियांचे समाजात दुय्यम स्थानामुळे पहिली पत्नी मृत झाली किंवा तिला सोडून दिले तरी त्याला दुसरी मिळते आणि पहिलीच्या नशिबी परित्यतेचे जीवन येते. परंतु स्त्रीच्या चरित्राला अतिशय महत्त्व दिले जात असल्याने मुलगी वयात आल्यानंतर एखादा पुरुषाचा वासनेला बळी पडू नये किंवा कुटुंबाची बदनाम होऊ नये म्हणून बालविवाहाची प्रथा रूढ झाली असावी.१९ व्या शतकात समाज सुधारणेच्या चळवळी सुरू झाल्या. त्यात बालविवाहाच्या प्रश्न अतिशय तीव्रपणे चर्चेला गेला.राजा मोहन रॉय,ईश्वरचंद्र विद्यासागर,केशवचंद्र सेन,या बंगाली व ज्योतिराव फुले, म.गो. रानडे, गो. ग. आगरकर, धो.के. कर्वे या मराठी समाजसुधारकांनी बालविवाहाच्या विरुद्ध मोहीमच उघडली.
या अनुषंगाने आजच्या २१व्या शतकात सुद्धा अनेक सामाजिक कार्यकर्ते बालविवाह थांबवण्यासाठी काम करत आहेत. बालविवाह तर गुन्हा आहे पण जर आजही हे घडत असेल तर ही काळीमा फासणारी गोष्ट आहे. यावर निर्बंध घातले गेलेच पाहिजेत आणि त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी सजक राहून प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे कारण समाजातील प्रत्येक घटकाचे निकोप समाज रचनेसाठी हे कामच आहे. तरी सर्व भारत देश वासियांना स्नेहालय उडान टीमकडून आव्हान करण्यात येते की, कुठेही बालविवाह होताना किंवा झालेल्या असल्याचा लक्षात आल्यास ताबडतोब उडान हेल्पलाइन (9011026495) किंवा चाइल्ड हेल्पलाइन (1098) संपर्क साधावा
