Maharashtra247

बलात्कार रोखण्यासाठी बदलायला हवे वातावरण आणि मानसिकता: सामाजिक कार्यकर्त्या काजल उर्फ निशा गवई

 

प्रतिनिधी:-नुकताच आशियातील सहा देशांमध्ये पुरुषांच्या बलात्कारामागच्या मानसिकतेचा शोध घेणारा एक सव्‍‌र्हे करण्यात आला. त्यासाठी दहा हजार पुरुष तसंच तीन हजार स्त्रियांच्या मुलाखती घेतल्या गेल्या.काय आढळलं या सव्‍‌र्हेमधून? दिल्लीत १६ डिसेंबर रोजी घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या खटल्याविषयी निकालपत्र जाहीर करण्यात येत होते.त्याच दिवशी आशियातील सहा देशांमध्ये पुरुषांसोबत केलेल्या एका सव्‍‌र्हेचा अहवाल प्रसिद्ध झाला होता.

बलात्कारासारखी हिंसक कृत्य करण्यामागे पुरुषांच्या कोणत्या प्रेरणा असतात याविषयी अनेक देशांत एकत्रितपणे केला गेलेला हा पहिलाच सव्‍‌र्हे आहे.आपल्या देशात महिलांविरुद्ध होणाऱ्या हिंसाचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता या अहवालाची दखल घेतली जायला हवी होती.पण त्या वेळी सगळा देश दिल्लीतल्या खटल्याबद्दल आणि त्यात जाहीर झालेल्या फाशीच्या शिक्षे विषयी उलटसुलट चर्चा करण्यात इतका मश्गूल होता की या महत्त्वाच्या सव्‍‌र्हेकडे बघायला कुणाला फुरसतच मिळाली नाही.

त्या चौघांना फाशीची शिक्षा ठोठावली गेली तेव्हा बलात्काराला बळी पडलेल्या त्या मुलीला खरा न्याय मिळाला,असे अनेकाना मनापासून वाटत होते.या कडक शिक्षेमुळे आता यापुढे असे गुन्हे करू पाहणाऱ्यांना चांगली जरब बसेल अशीही बऱ्याच जणांची समजूत आहे.कारण गुन्हेगार व्यक्तींना फासावर लटकावले म्हणजे,न्याय झाला अशी जी लोकप्रिय समजूत आहे तीच मुळात तपासून बघण्याची गरज आहे असे आमचे म्हणणे होते.

एका शिक्षेमुळे समाजातून बलात्कार नाहीसा होणार नाही तर त्यासाठी आपल्या समाजात जे बलात्काराला पोषक वातावरण तयार झालेले आहे,ते बदलण्याची गरज आहे हे आपल्याला लक्षात घेतले पाहिजे. मात्र हा खूप वेळखाऊ आणि लांब पल्ल्याचा उपाय आहे असे अनेकांना वाटते.पण जशी आज २०१३ साली फाशीची शिक्षा झाली आहे तशी २००४ साली देखील धनंजय चटर्जी नावाच्या माणसाला एका अल्पवयीन मुलीचा बलात्कार आणि खून करण्याबद्दल फाशी झाली होती.त्यानंतर मधल्या नऊ वर्षांच्या काळात स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांमध्ये कितीशी घट झाली आहे? त्याचप्रमाणे आज चार जणांना फासावर चढवल्यामुळे उद्यापासून ताबडतोब सगळ्या महिलांना सुरक्षित वाटायला लागणार नाही.

शब्दांकन-सामाजिक कार्यकर्त्या काजल उर्फ निशा गवई यवतमाळ

You cannot copy content of this page