‘होय मी दुर्गा बोलते’ कार्यक्रमातून महिलांच्या संघर्षाची प्रेरणादायी कथा उजळली
अहिल्यानगर (दि.९ ऑक्टो):-शारदीय नवरात्र उत्सवाच्या पावन पर्वावर ८ ऑक्टोबर २०२४ रोजी लोकनेता डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित ‘होय मी दुर्गा बोलते’ ‘एका स्त्रीच्या संघर्षाची कहाणी’ या सक्षमीकरण कार्यक्रमाने महिलांच्या सशक्तीकरणाची दिशा दाखवली.डॉ.राधाकृष्ण विखे पाटील (मंत्री, महसूल,पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास, महाराष्ट्र राज्य) यांच्या मार्गदर्शनाखाली, महिलांच्या सबलीकरणासाठी विशेष ठरलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षपद माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी भूषविले.
प्रमुख पाहुणे म्हणून स्नेहालय संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती जयाताई जोगदंड,प्राचार्य डॉ. सोपानराव शिंगोटे, उपप्राचार्य व महिला सक्षमीकरण कक्ष समन्वयक डॉ.डी.जे. आर.सीनगर,उपप्राचार्य डॉ.डी.घोलप,उडान प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रवीण कदम आणि युवा निर्माण प्रकल्पाचे व्यवस्थापक विकास सुतार हे उपस्थित होते.
कार्यक्रमातील ठळक मुद्दे
जयाताई जोगदंड यांनी आपल्या आयुष्यातील संघर्षांची हृदयस्पर्शी कहाणी सांगितली.त्यांनी शिक्षण आणि स्वावलंबनाचे महत्त्व सांगताना असे म्हटले, “मी शिक्षणासाठी संघर्ष केला नाही,परंतु आजच्या स्त्रियांनी ते आवर्जून करावे,कारण शिक्षण हेच त्यांच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार आहे. संघर्षाचे चटके मी सहन केले,परंतु तुमच्या पुढच्या पिढ्यांना ते टाळता येऊ शकतात.”
शालिनीताई विखे पाटील
यांनी आपल्या संघर्षातून जिंकलेल्या विजयाच्या कथा सांगत विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले, “आयुष्यात कितीही आव्हाने आली तरी, आपल्या ध्येयावर ठाम राहा.तुमचे ध्येय गाठण्यासाठी पालकांचा विश्वास संपादन करा आणि कोणत्याही परिस्थितीत शांततेने मार्गक्रमण करा.”
प्रवीण कदम
यांनी बालविवाहाच्या गंभीर समस्येवर प्रकाश टाकला.त्यांनी सांगितले, “बालविवाह समाजाचा अभिशाप आहे.त्याचे परिणाम बालवधूंच्या जीवनावर अत्यंत नकारात्मक असतात. आपला जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी युवकांनीच पुढाकार घेतला पाहिजे.”
कार्यक्रमाचा समारोप
या सशक्तीकरण कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थ्यांनी आपल्या जिल्ह्याला बालविवाहमुक्त करण्याची सामूहिक शपथ घेऊन करण्यात आला. “उडान” आणि “युवा निर्माण” प्रकल्पाच्या या पुढाकाराने नवा इतिहास घडवण्याचे स्वप्न उराशी बाळगत, महिलांच्या सक्षमीकरणासाठी नवी दिशा निश्चित केली.