अमृत भुयारी गटार योजनेचे काम पूर्णत्वाकडे;अमृत भुयारी गटार योजनेमुळे सीना नदी स्वच्छ,सुंदर म्हणून ओळखली जाईल-आ.संग्राम जगताप
अहिल्यानगर (दि.९ ऑक्टो):-शहराचा महत्वकांक्षी असलेला अमृत भुयारी गटात योजना पंपींग स्टेशन व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम मार्गी लागावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. आज प्रत्यक्षात हे काम पूर्णत्वाकडे जात आहे आणि लवकरच हा प्रकल्प सुरू होणार असून शहरातील सीना नदीमध्ये सोडलेले दूषित पाणी आता पाईप लाईनद्वारे थेट सांडपाणी प्रक्रिया केंद्रामध्ये घेऊन जाण्याचे काम केले जाणार आहे,आणि त्यावर प्रक्रिया होऊन ते पाणी शुद्ध केले जाणार आहे,त्याचा उपयोग शेतकऱ्यांना,उद्यान आणि काँक्रीटचे रस्ते धुण्यासाठी होणार आहे.
आता सीना नदीचे रुंदीकरण,खोलीकरण व सुशोभीकरण काम करण्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे, त्यामुळे सीना नदी स्वच्छ,सुंदर म्हणून ओळखली जाईल, शहरातील एकएक प्रकल्पाचे काम हाती घेऊन पूर्ण होत असल्याचा आनंद होत असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.फुलसौंदर मळा येथील अमृत भुयारीगटार योजना व प्रकल्पाची आमदार संग्राम जगताप व आयुक्त यशवंत डांगे यांनी पाहणी केली यावेळी शहर अभियंता मनोज पारखे, इंजिनिअर श्रीकांत निंबाळकर,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता जय बिवाल आदीसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, नगर शहरातून ७ नाले वाहत असून त्यात सोडलेले मैलमिश्रित सांड पाणी आता शहरातील 110 km अंतराची अंतर्गत भुयारी गटार योजनेद्वारे सीना नदीच्या उजव्या व डाव्या बाजूने १२00 एम एम व्यासाची बंदिस्त पाईपाद्वारेसुमारे 15 किलोमीटर वाहून नेत फुलसौंदर मळ्यातील पंपिंग स्टेशन जवळ सांडपाणी गोळा केले जाईल व या ठिकाणाहून अशुद्ध पाणी 2100 एचपी पावरच्या ७ पंपाद्वारे वाकोडी शिवारातील 57 एम एल टी च्या प्लांटमध्ये घेऊन जात त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.
बीओडी १० पेक्षा कमी करून हे शुद्ध पाणी शेतकऱ्यांना वापरासाठी उद्यानासाठी केले जाणार आहे, या माध्यमातून सीना नदीच्या संवर्धनासाठी उचललेले एक महत्त्वाचे पाऊल असून या प्रकल्पाची यशस्वी चाचणी दसऱ्याच्या दरम्यान करण्यात येणार आहे, तसेच केंद्र व राज्य सरकारचे पीएमओ व सीएमओ ऑफिसच्या संपर्कात राहून लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न होणार आहे असे ते म्हणाले.