गॅस कंपनीच्या ठेकेदाराकडे तब्बल १० लाखांच्या खंडणीची मागणी..
अहिल्यानगर (दि.२४ प्रतिनिधी):-एमआयडीसीत गॅस पाईपलाईनचे कामकाज चालू करायचे असेल तर 10 लाख रुपये द्यावे लागतील,असे म्हणून ठेकेदाराकडे खंडणीची मागणी करणार्या दोघांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीपीसीएल गॅस पाईपलाईनचे ठेकेदार अंकित पारस पिचा (वय 30 हल्ली रा. पाईपलाईन रस्ता, सावेडी,अहिल्यानगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.सोमनाथ कराळे (पूर्ण नाव नाही, रा.नागापूर, अहिल्यानगर) व एक अनोळखी इसम यांच्या विरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे 5 ऑक्टोबर रोजी कामानिमित्त एमआयडीसीतील कार्यालयाच्या बाहेर उभे असताना सोमनाथ तेथे आला.तो फिर्यादीला म्हणाला,गॅस पाईपलाईनचे कॉन्ट्रक्टर तुम्हीच का? तुम्हाला एमआयडीसीमध्ये गॅस पाईपलाईनचे कामकाज करायचे असेल तर 10 लाख रुपये द्यावे लागतील,तुम्हाला माझ्या परवानगी शिवाय कामकाज चालू करता येणार नाही.तेव्हा फिर्यादी त्याला म्हणाले, तुम्हाला पैसे का द्यायचे त्यानंतर सोमनाथने फिर्यादीला शिवीगाळ करून मी या गावचा दादा आहे,तु मला पैसे दिले नाही तर मी तुझे कामकाज चालू देणार नाही.
तसेच तुझ्या कामगारांना मारहाण करून त्यांना पळवून लावेल असे म्हणून तो तेथून निघून गेला.या घटनेचा अधिक तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनी.माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोना.जी.के.पालवे हे करीत आहेत.