सरपंच तुकाराम कातोरे शिक्षक मित्र मंडळाचा उपक्रम अनोख्या दिवाळीने रेल्वे स्टेशनवरील निराधार गहिवरले;नवीन कपडे व मिठाई वाटप करत सर्व मित्रांनी राखली १७ वर्षांची परंपरा कायम
अहिल्यानगर (दि.१ प्रतिनिधी):-उठा उठा दिवाळी आली…. अभ्यंग स्नानाची वेळ झाली….आई दादा बाबा बाळांनो उठाना..आंघोळी करून घ्या,आज दिवाळी आहे, नवीन कपडे घाला मिठाई खा असे आपुलकीचे व प्रेमळ शब्द कानावर पडताच निराधार झोपेतून जागे झाले.
अहिल्यानगर रेल्वे स्टेशन वरील हे दृश्य निमित्त होते दिवाळीच्या सणाचे येथे जमीन अंथरूण व आभाळ पांघरून मूठभर घास आणि घोटभर पाण्यावर असंख्य निराधार विकलांग व वृद्ध मनोरुग्ण स्री पुरुष बालके कायम वास्तव्यास असतात स्टेशन परिसर म्हणजे त्यांच्या हक्काचे आश्रयस्थान व तेच त्यांचे घर वयोमानाने व शारीरिक व्यंगाने त्यांना काम धंदा होत नाही मळके कपडे डोक्यावर वाढलेले केस दाढी मिशा वाढलेल्या असे चित्र तेथे पहावयास मिळते त्यांच्या नशिबी कसली दिवाळी आणि गोड धोड असं असलं तरी त्यांना दिवाळी सणाचा आनंद मिळावा या भावनेतून अहिल्यानगर तालुक्यातील कामरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा सरपंच तुकाराम कातोरे व त्यांचा शिक्षक मित्र परिवार गेल्या १७ वर्षापासून रेल्वे स्टेशनवर वंचित निराधारांना सोबत घेऊन दिवाळीचा सण साजरा करतात.
आज भल्या सकाळीच सरपंच तुकाराम कातोरे यांचे सह ग्रंथालय चळवळीचे सुखदेव वेताळ सर, सामाजिक कार्यकर्ते संदीप कोल्हे,माजी केंद्रप्रमुख अशोकराव धसाळ,प्राचार्य श्रीकांत कातोरे, प्रांत कार्यालयातील महसूल अधिकारी नंदकुमार साठे,उद्योजक अजित पवार,सुनील ढवळे सर,समर्थ कातोरे, यश वेताळ,विस्तार अधिकारी चंद्रकांत सोनार,माजी विस्तारआधिकारी सोन्याबापु ठोकळ,राजेंद्र शिंदे,भागचंद सातपुते सर,प्राध्यापक लाटे सर,रेल्वे पोलीस अरुण भोर,बबनराव साळुंखे,संतोष गुंजाळ,शिलाताई गुगळे,अरुण नानेकर,अशोक बुधवंत, दिलीप नानेकर हे रेल्वे स्टेशनवर जमा झाले त्यांनी निराधारांना स्वतःच्या हाताने आंघोळी घातल्या नाभिक बबन साळुंखे यांनी निराधार वृद्धांचे डोक्यावर वाढलेले केस व दाढी मिशा कमी केल्या त्यामुळे सर्वांचे चेहरे आनंदाने उजळून निघाले या उपक्रमात कातोरे यांचेसह उद्योजक अजित पवार, शीलाताई गुगळे, ग्रंथालय चळवळीचे सुखदेव वेताळ, अशोकराव धसाळ यांचे विशेष योगदान मिळाले.
आज सर्वत्र दिवाळीचा सण धुमधडाक्यात साजरा होत असताना निराधार वंचिताना सोबत घेऊन कातोरे मित्र परिवारांनी दिवाळीचा सण साजरा केला हा उपक्रम निश्चितच स्तुत्य व प्रेरणादायी असा आहे या उपक्रमाचे इतर सेवाभावी संस्थांनी व दानशूर व्यक्तींनी याचे अनुकरण करावे असे सरपंच तुकाराम कातोरे यांनी म्हटले.या यावेळी सूत्रसंचालन ग्रंथालय चळवळीचे सुखदेव वेताळ यांनी केले व आभार श्री.भागचंद सातपुते यांनी मानले.