Maharashtra247

चैन स्नॅचिंग गुन्हयातील ‘बल्ली’ अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 

अहिल्यानगर (दि.११ प्रतिनिधी):-अहिल्यानगर शहरातील जबरी चोरीच्या (चैन स्नॅचिंग) गुन्हयातील आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून आरोपीकडून गुन्हयातील मुद्देमाल हस्तगत केला आहे.

बातमीची हकिगत अशी की,फिर्यादी श्रीमती अलका रमेश कांबळे, (वय 69, रा.किर्लोस्कर कॉलनी,गुलमोहर रोड, अहिल्यानगर) या दि. 07 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी गुलमोहर रोडने पायी जात असताना त्यांचे पाठीमागुन एक अनोळखी इसम मोटार सायकलवर येऊन, फिर्यादीचे गळयातील सोन्याची चैन बळजबरीने हिसकावून चोरून नेली.याबाबत तोफखाना पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 1226/2024 बीएनएस कलम 309 (4) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर घडलेल्या घटनेबाबत श्री.राकेश ओला, पोलीस अधिक्षक अहिल्यानगर यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना गुन्हे उघडकीस आणणेबाबत विशेष पथक नेमुण कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/तुषार धाकराव व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे,मनोहर गोसावी,गणेश भिंगारदे,संतोष खैरे,बाळासाहेब गुंजाळ,संदीप पवार,विशाल तनपुरे,रमिजराजा आत्तार व मेघराज कोल्हे अशांचे पथक नेमुण गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन केले.

गुन्हयांचे तपासामध्ये तपास पथकाने घटनाठिकाणी भेट देवुन सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेत असताना दिनांक 09 नोव्हेंबर 2024 रोजी तपास पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा आरोपी नामे बल्ली यादव, (रा.वॉर्ड नं.7,श्रीरामपूर) याने केला असून तो आता ढवणवस्ती, माऊलीनगर, अहिल्यानगर येथे आलेला आहे.तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ बातमीतील ठिकाणी जाऊन संशयीत इसमाचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. ताब्यातील इसमास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव बलराम उर्फ बली रामचिंत यादव, वय 25, रा.सरस्वती कॉलनी, वॉर्ड नं.7,श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.

आरोपीकडे वर नमूद गुन्हयांचे अनुषंगाने विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा त्याचे कडील होंडा शाईन कंपनीचे मोटार सायकलवर केलेला असून गुन्हयातील मुद्देमाल हा अक्षय ज्वेलर्स,लोणी येथील मिरा बनसोड यांना विकल्याची माहिती दिली.तपास पथकाने पंचासमक्ष अक्षय ज्वेलर्स,लोणी येथून 50,000/-रूपये किंमतीची सोन्याची लगड तपासकामी जप्त केली आहे.ताब्यातील आरोपी बलराम उर्फ बली रामचिंत यादव, वय 25, रा.सरस्वती कॉलनी, वॉर्ड नं.7, श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर गुन्ह्याचे तपासकामी तोफखाना पोलीस ठाणे येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असुन पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन हे करीत आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.

You cannot copy content of this page