अहिल्यानगर (प्रतिनिधी):-संगमनेर शहरामध्ये गुटखा वाहतुक करणाऱ्या आरोपीकडून तब्बल 6 लाख 93,600/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री दिनेश आहेर यांना जिल्ह्यामध्ये अवैध व्यावसायिकांवर कारवाई करणेबाबत आदेश दिलेले होते.
नमुद आदेशाप्रमाणे पोनि श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार संतोष लोढे,सोमनाथ झांबरे, रणजीत जाधव,विशाल तनपुरे व बाळासाहेब गुंजाळ अशांचे पथक तयार करून संगमनेर शहरामध्ये अवैध व्यावसायिकांची माहिती काढुन त्यांचे विरुध्द कारवाई करणे बाबत सुचना देऊन पथक रवाना केले होते.तपास पथक दि. 25/11/2024 रोजी संगमनेर शहरामध्ये पेट्रोलिंग करत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सुनिल रमेश नाईकवाडे, (रा.धामणगाव पाट, ता.अकोले, जि.अहिल्यानगर) हा त्याचे कडील मारूती इको वाहनातून गुटखा,पानमसाला व जर्दा विक्रीसाठी संगमनेर येथुन घेऊन जाणार आहे.तपास पथकाने मिळालेल्या माहितीवरून अकोले नाका,संगमनेर या ठिकाणी सापळा लावून बातमीतील संशयीत वाहन मिळून आल्याने,वाहनास थांबवून त्यामधील इसमास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुनिल रमेश नाईकवाडे (वय 34,रा.धामणगाव पाट, ता.अकोले, जि.अहिल्यानगर) असे असल्याचे सांगितले. पंचासमक्ष त्याचे ताब्यातून 1,74,240/- रू किं.त्यात विमल सुगंधीत पान मसाला, 19,360/- रू किं. तंबाखु व 5,00,000/- रू.किंमतीची मारूती कंपनीची इको कार क्रमांक एमएच-16-डीई-7966 असा एकुण 6,93,600/-रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीस जप्त करण्यात आलेला गुटखा कोणाकडून आणला याबाबत चौकशी केली असता सदरचा गुटखा हा गोपाल रा.कोल्हापूर (पुर्ण नाव माहित नाही फरार) याचे कडून घेतला असलेबाबत माहिती दिली.नमूद आरोपी विरूध्द संगमनेर शहर पोलीस स्टेशन गुरनं 978/2024 बीएनएस 2023 चे कलम 223, 274, 275, 123, 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, व श्री.कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर उप विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.