सहायता निधीची रक्कम वाढवा, रूग्णसंख्या अमर्याद करा;खा.नीलेश लंके यांची लोकसभेत आग्रही मागणी
अहिल्यानगर प्रतिनिधी:-पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधी अंतर्गत रूग्णांना देण्यात येणारी ३ लाख ही कमाल रक्कम वाढविण्यात यावी तसेच एका सदस्याची ३५ रूग्णांची मर्यादा हटवून ती अमर्याद करण्याची आग्रही मागणी नगरचे खासदार नीलेश लंके यांनी सोमवारी लोकसभेत केली.लोकसभेत सभागृहाचे लक्ष वेधताना खा.लंके म्हणाले,पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधी अंतर्गत देण्यात येणारी कमाल रक्कम तीन लाख रूपये आहे.आजाराचा संपूर्ण खर्च भागविण्यासाठी ही रक्कम पुरेशी नसून ही मर्यादा वाढविण्याची गरज आहे.
पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधीअंतर्गत एक वर्षात एका सदस्याला ३५ रूग्णांना मदत करता येते. ही मर्यादा योग्य नाही. ही मर्यादा काढून टाकून ती अमर्याद करण्यात यावी अशी मागणी लंके यांनी केली.पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधी अंतर्गत नेमण्यात आलेल्या पॅनलमध्ये रूग्णालयांची संख्या वाढविण्याची आवष्यकता आहे. ही संख्या लवकरात लवकर वाढवून एका तालुक्यात किमान एक रूग्णालय या पॅनलमध्ये घेण्याची मागणीही लंके यांनी केली.पंतप्रधान राष्ट्रीय निधी अंतर्गत पाठविण्यात येणारे प्रस्ताव हे पोष्टाने मागविले जातात. त्यात बदल करून हे प्रस्ताव ऑनलाईन मागविण्यात यावेत जेणेकरून रूग्णाला कमी वेळेत लवकरात लवकर आर्थिक मदत मिळू शकेल असेही लंके यांनी सांगितले.या योजनेअंतर्गत एखादा विशेष बाब हा पर्याय असायला हवा.एखाद्या रूग्णाचा आजार सुचीमध्ये नसेल तर विशेष बाब या पर्यायातून त्या रूग्णाला मदत करता येईल. असेही लंके यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
खा.लंके यांचा कोटा ६ महिन्यात संपला !
एक वर्षात एका सदस्याला ३५ रूग्णांना मदत करता येते.खा. नीलेश लंके यांनी या योजनेअंतर्गत शेकडो प्रस्ताव दाखल केले असून सहा महिन्यात त्यांचा कोटा संपला आहे. तर अनेक प्रस्ताव प्रलंबित आहे. यासंदर्भात त्यांनी संबंधित मंत्री तसेच अधिकाऱ्यांची भेट घेउन प्रलंबित रूग्णांना मदत करण्याची गळ घातली आहे.त्याच पार्श्वभुमीवर सदस्यांसाठी अमर्याद कोटा देण्याची मागणी लोकसभेमध्ये केली आहे. विधानसभेत काम करताना खा.नीलेश लंके यांनी मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत राज्यात सर्वाधिक रूग्णांना मदत मिळवून दिली असून पंतप्रधान सहायता योजनेतूनही जास्तीत जास्त रूग्णांना मदत मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधी अंतर्गत रूग्णांना देण्यात येणारी ३ लाख ही कमाल रक्कम वाढविण्यात यावी व रूग्णसंख्या अमर्याद करण्याची मागणी खा. नीलेश लंके यांनी सोमवारी लोकसभेमध्ये केली.