Maharashtra247

स्वतःचा ब्रँड तयार करा:सुनीती बेकरीच्या दुसऱ्या बॅचचे उद्घाटन संपन्न

 

 

अहिल्यानगर (प्रतिनिधी):-स्नेहालयाच्या कौशल्य विकास केंद्रातर्फे नवनवीन उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक क्षमतेला वाव देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहण्यात येते.याच उपक्रमाचा एक भाग म्हणून सुनीती बेकरीच्या दुसऱ्या बॅचचे उद्घाटन प्रतिष्ठित व्यावसायिक मिलिंद भद्रे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.

या कार्यक्रमात स्नेहालयातील लाभार्थीगट तसेच स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून बेकरी उत्पादनाचे सखोल ज्ञान दिले जाते.बेकरीचे विविध पदार्थ,केक, बिस्किटे तयार करण्याचे कौशल्य विकसित करण्यासाठी आयोजित या प्रशिक्षणात विद्यार्थी भविष्यात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने सक्षम बनत आहेत.उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना मिलिंद भद्रे म्हणाले,”हा कोर्स केवळ शिकवणीत थांबू नये, तर त्याचा उपयोग तुमच्या स्वतःच्या ब्रँडच्या निर्मितीसाठी करा. व्यावसायिक दृष्टिकोनातून याकडे पाहणे ही काळाची गरज आहे.तुमच्यासाठी आम्ही सदैव उभे आहोत. मेहनत,कल्पकता, आणि चिकाटीने तुम्ही स्वतःला मोठ्या उंचीवर नेऊ शकता.”कार्यक्रमादरम्यान स्नेहालयचे सचिव डॉ. प्रीती भोंबे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत सांगितले,”प्रारंभिक टप्प्यातील शिक्षण महत्त्वाचे आहे,पण त्यात परिपूर्णता आणण्यासाठी पुढील सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे.हा कोर्स तुम्हाला केवळ बेकरी उत्पादने बनवण्याचेच नव्हे,तर स्वतःचा यशस्वी व्यवसाय उभा करण्याचे स्वप्न पाहण्यास मदत करेल.

“संजय बंदिष्टी यांनी आपल्या भाषणात विद्यार्थी व उपस्थितांना उद्देशून सांगितले की, “स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी फक्त कौशल्य नव्हे तर आत्मविश्वासही तेवढाच महत्त्वाचा आहे. या कोर्सद्वारे विद्यार्थ्यांनी स्वतःचे भविष्य घडवावे.”या प्रसंगी पहिल्या बॅचच्या १८ विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व बक्षिसांनी सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांमध्ये स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलचे संचालक राजेंद्र शुक्रे, स्नेहालयचे विश्वस्त राजीव गुजर व इतर मान्यवर सहभागी होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विक्री प्रशिक्षक श्रीनिवास तडका यांनी केले, तर सूत्रसंचालन सचेत फाउंडेशनच्या कोमल भापकर आणि मयूर शेलार यांनी अतिशय प्रभावी पद्धतीने पार पाडले.शेवटी, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक सागर दोंदे यांनी केले.स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलच्या सर्व शिक्षकवृंद,प्रशिक्षक व विद्यार्थ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.

You cannot copy content of this page