अहमदनगर प्रतिनिधी (दि.२४ जानेवारी)-शहरात चर्मकार संघर्ष समिती महिला आघाडीच्या वतीने झालेल्या मेळाव्यात स्त्री शक्तीचा जागर करण्यात आला. तर खडतर परिस्थितीमध्ये आपल्या मुलांना उच्चशिक्षित करुन समाज घडविणार्या सर्व जाती-धर्मातील महिलांना आदर्श माता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हळदी-कुंकू कार्यक्रमात एकवटलेल्या सर्व जाती-धर्माच्या महिलांनी महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी एकजुटीचा नारा दिला.शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन महापुरुष व आदर्श महिलांच्या प्रतिमेस अभिवादन करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. महिला जिल्हाध्यक्षा मीनाताई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रम प्रसंगी चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साळवे,कॉ. स्मिता पानसरे,नगरसेविका दिपाली बारस्कर, नगरसेविका शितल जगताप,, सुनंदा शेंडे, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लोहकरे, संजय दळवी, युवक प्रदेशाध्यक्ष सुभाष भागवत, कॉ. बन्सी सातपुते, डॉ. सोनाली वहाडणे, शहराध्यक्ष शशिकला झरेकर, नेत्रतज्ञ डॉ. रावसाहेब बोरुडे, प्रा.डॉ. अशोक कानडे, बाळकृष्ण जगताप, युवक अध्यक्ष अभिजीत खरात, नगर स्वतंत्र चे संपादक सुभाष चिंधे, शाहीर भारत गाडेकर, विठ्ठल जयकर, बापूसाहेब देवरे, नंदकुमार गायकवाड, जिल्हा संघटक दिलीप शेंडे, अॅड. अनुराधा येवले आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.शिवाजी साळवे म्हणाले की,महिला सक्षम झाल्याशिवाय समाजाचा विकास साधला जाणार नाही . समाज एकत्र आल्याशिवाय न्याय मिळणार नाही . या महिला मेळाव्याच्या माध्यमातून सर्व जाती धर्मातील महिलांना एकत्र आणण्याचे काम करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले . चर्मकार संघर्ष समितीच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचे काम यापुढेही चालूच राहील. चर्मकार संघर्ष समितीच्या माध्यमातून सर्व बहुजन समाजाला एकत्र करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे. चर्मकार संघर्ष समितीच्या माध्यमातून चर्मकार समाजाचे प्रश्न सोडविले जात आहेत आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. कॉम्रेड स्मिता पानसरे म्हणाल्या महिलांनी वाण म्हणून सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊंचे विचार घ्यावे. संघटितपणे संघर्ष केल्याशिवाय बदल घडणार नाही. महिलांमध्ये ज्या उतरंडी आहेत, त्या नाहीस्या केल्या पाहिजे.महिला म्हणून सर्वांनी एकत्र या व एकमेकींचा सन्मान राखण्याचे त्यांनी आवाहन केले.नगरसेविका शितल जगताप यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळून महिलेला सामाजिक जबाबदार्या पेलाव्या लागतात. कर्तुत्वाने उभे राहताना स्वाभिमान व आत्मविश्वास वेगळ्या दिशेने घेऊन जातो. सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर असून, त्यांनी ठरविल्यास सर्व काही शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. सोनाली वहाडणे यांनी सदृढ आरोग्य, हीच सुखी कुटुंबाची संपत्ती आहे. निरोगी आरोग्य व आनंदी जीवनासाठी महिलांनी आहार व व्यायामाकडे लक्ष देणे काळाची गरज बनली आहे. आजच्या युगात निरोगी आयुष्य जगायचे असेल, तर सकस आहाराला व्यायामाची जोड द्यावी लागणार. स्पर्धामय युगात कुटुंब सांभाळत असताना महिलांच्या आरोग्याचे प्रश्न उभे राहत आहे. महिलांनी आरोग्याबाबत जागरुक राहण्याचे त्यांनी आवाहन केले. प्रास्ताविकात अभिजीत खरात यांनी महिलांचे संघटन करुन एकमेकींचे वैचारिक देवाण घेवाण होण्यासाठी या कार्यक्रमाचे उद्दिष्टाची माहिती दिली.शाहीर भारत गाडेकर यांनी प्रबोधनावर गीत सादर करून समाजातील अंधश्रध्देवर बोट ठेवले. तर विविध गीतांनी स्त्री शक्ती व कर्तृत्वाचा जागर केला. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सुनंदा नन्नावरे, पुष्पलता वीरकर, स्व. रेऊबाई म्हैसमाळे, पुष्पा आंबेडकर, लक्ष्मी साळवे, भीमाबाई बारस्कर, पुष्पलता देशमुख, सुभद्रा त्र्यंबके यांना आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक टकले व ज्योती बर्डे यांनी केले तर आभार संगीता सोनवणे यांनी मानले.
