संगमनेर प्रतिनिधी/नितीनचंद्र भालेराव:-अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात पठार भागात असणाऱ्या श्री.बाळेश्वर मंदिरातील पोलीस यंत्रणेच्या बिनतारी संदेश व्यवस्थेसाठी ड्युटीवर असणाऱ्या पोलीस हेडकॉन्स्टेबलला दमदाटी करण्याचा प्रकार झाला असून यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
दमदाटी,शिवीगाळ आणि मारण्याची धमकी देणारे हे खासगी गाडीला पोलीस नावाचा फलक लावून आलेले होते.संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील श्री बाळेश्वर मंदिर परिसरात पोलिसांची बिनतारी यंत्रणा आहे.येथे संरक्षण ड्युटीला असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला चौघांनी दमबाजी, शिवीगाळ व मारहाण करण्याची धमकी दिली. यावर कळस म्हणजे घारगाव (ता.संगमनेर) पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेलेल्या त्या पोलिसाला तक्रार देण्यासाठी तब्बल सहा तास थांबावे लागले. एवढे होऊनही घारगाव पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेतला आहे.
सचिन वैष्णव (गाव माहीत नाही),फॉरेस्ट अधिकारी (गाव, पत्ता माहीत नाही) व इतर दोघे अशा एकूण चार जणांविरोधात पोलिस हेड कॉन्स्टेबल रघुनाथ खेडकर (नेमणूक, पोलिस मुख्यालय, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. बाळेश्वर मंदिर परिसरात पोलिसांची बिनतारी यंत्रणा आहे.येथे पोलिस हेड कॉन्स्टेबल खेडकर ड्युटीला असताना सोमवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास बाहेर आरडाओरड सुरू होती. त्यामुळे त्यांनी बाहेर जावून पाहिले असता मंदिराच्या दरवाजाचे काम करणाऱ्या कामगारांना चौघे दमबाजी करत होते. ‘ते कामगार आहेत, त्यांना बोलू नका’ असे खेडकर त्यांना म्हणाले. व त्यांनी वॉकीटॉकीद्वारे घारगाव पोलिसांची मदत मागितली.