अहिल्यानगर (दि.१ फेब्रुवारी):-संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्ती शौकिनांचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढती पाहण्यासाठी अहिल्यानगरासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने कुस्ती शौकीन वाडिया पार्क येथील कै. बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरीत दाखल झाले होते.
महाराष्ट्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी दोन्ही सत्रातील उत्कंठावर्धक लढतींनी कुस्ती शौकीनांची मने जिंकली.राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस व आयोजक तथा कुस्तीगीर संघाचे जिल्हाध्यक्ष आ.संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत माती व गादी प्रकारातील कुस्तीचे सामने रंगले होते.
माती विभागात महेंद्र गायकवाड,संदीप मोटे,वेताळ शेळके, विशाल बनकर, अनिकेत मांगडे, आकाश रानवडे तर गादी विभागात महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, पृथ्वीराज मोहोळ, सुदर्शन खोतकर यांनी विजयी घोडदौड कायम ठेवली तर महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख,हर्षवर्धन सदगीर यांच्यासह महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार ज्ञानेश्वर जमदाडे,हर्षद कोकाटे,शुभम शिंदनाळे, श्रीमंत भोसले,नरेश म्हात्रे,गणेश कुकुते, अभिमन्यू फुले,भरत कराड,रमेश बहिरवाल, वैभव माने यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. माती व गादी विभागातील ५७, ८६ , ६१, ७९ , ६५, ७४, ९२ आणि महाराष्ट्र केसरी (८६ ते १२५ ) किलो वजनी गटातील काही गटातील गतविजेत्यांना अनपेक्षितपणे पराभवाला सामोरे जावे लागले.तर काहींनी धक्कादायक निकालाची नोंद करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला.