प्रतिनिधी:-महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी कठोर कायदे असतानाही सक्षम यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला न्याय मिळवण्यासाठी तब्बल तीन महिने संघर्ष करावा लागला. अखेर सातत्याने प्रयत्न केल्यानंतर 150 जणांवर गुन्हा दाखल करून संपूर्ण वऱ्हाड तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
महिला सुरक्षा संघटनेच्या राष्ट्रीय निरीक्षक जयश्री भरत घावटे/ठुबे यांना नोव्हेंबर 2024 मध्ये या बालविवाहाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने चाइल्ड हेल्पलाइन 1098/112 वर संपर्क साधला.यानंतर नगर चाइल्ड हेल्पलाइन आणि छत्रपती संभाजीनगर हेल्पलाइन यांच्याद्वारे पुढील प्रक्रिया सुरू झाली.मुलीच्या मामाच्या घरी भेंडाळा,जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथे हा विवाह होणार असल्याची माहिती मिळाली. मात्र,अचूक ठिकाण माहीत नसल्याने लग्न थांबवणे शक्य झाले नाही.विवाह पार पडल्यानंतर नागरिकांनी सामाजिक कार्यकर्त्यां जयश्री ठुबे यांना फोटो पाठवले. चौकशीत स्पष्ट झाले की,मुलीला पैठण तालुक्यातील एका गावी हलवण्यात आले आहे.
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन स्नेहालय संस्थेचे उडान प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम यांनी व सामाजिक कार्यकर्त्यां जयश्री ठुबे यांनी सातत्याने पाठपुरावा केला.अखेर तीन महिन्यांच्या संघर्षानंतर हा गुन्हा दाखल झाला.या प्रक्रियेत छत्रपती संभाजीनगर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दीपक बजारे यांच्या मार्गदर्शनाखाली चाइल्ड हेल्पलाइनने पुढाकार घेतला.पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात आली. पोलिसांनी मुलीला बालानगर येथून ताब्यात घेऊन पैठण पोलीस स्टेशनमध्ये आणले. मात्र, “गुन्हा त्यांच्या हद्दीत घडला नाही” असे सांगत त्यांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला.झिरो एफआयआर दाखल करण्याची विनंतीही फेटाळण्यात आली. शेवटी,मुलीला गंगापूर पोलीस स्टेशनला हलवण्यात आले.या प्रकरणात कठोर कारवाई करत बालविवाहात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असलेल्या 150 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. लग्न लावणारे भडजी, फोटोग्राफर, मंडपवाले, आचारी, मेहंदी आणि मेकअप करणारे, वर-वधूचे आई-वडील, काका, मामा, मावशी, शेजारी आणि नातेवाईक तसेच लग्नास उपस्थित असलेले मित्रपरिवार व पाहुणे यांच्यावर बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 अंतर्गत कलम 9, 10, 11 नुसार भेंडाळा गावचे ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी राहुल समाधान चराटे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली.
या घटनेमुळे मुलीच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला.ती तणावाखाली गेली आणि तिच्या आरोग्यावर परिणाम झाला.तरीही, प्रशासनाच्या कोणत्याही यंत्रणेकडून संवेदनशीलता दाखवली गेली नाही.जयश्री घावटे/ठुबे यांनी या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, “मुलींच्या संरक्षणासाठी कायदे आहेत,पण सक्षम अधिकारी नाहीत” असे स्पष्ट केले.जर तातडीने आणि प्रभावी कारवाई झाली असती, तर एका निष्पाप मुलीला हा संघर्ष करावा लागला नसता.
आवाहन
बालविवाह रोखण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा. कुठेही बालविवाह होत असल्याचे आढळल्यास तातडीने खालील हेल्पलाईन क्रमांकावर माहिती द्यावी.चाइल्ड हेल्पलाईन – 1098 उडान बालविवाह प्रतिबंधक प्रकल्प हेल्पलाईन – 9011026495
आपली गोपनीयता पूर्णतःराखली जाईल,महिला सुरक्षा संघटनेच्या राष्ट्रीय निरीक्षक जयश्री ठुबे यांनी केले आवाहन
या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणारे स्नेहालयच्या उडान प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम, सोशल वर्कर पूजा दहातोंडे, गंगापूर पोलीस स्टेशनची संपूर्ण यंत्रणा आणि कर्मचारी तसेच छत्रपती संभाजीनगर चाइल्ड हेल्पलाइन,महिला सुरक्षा संघटनेच्या राष्ट्रीय निरीक्षक जयश्री भरत घावटे/ठुबे व संपूर्ण टीम यांनी अथक परिश्रम घेतले.