अहिल्यानगर (दि.19 फेब्रुवारी):- राहता तालुक्यातील एका गावात १६ फेब्रुवारी रोजी अवघ्या १६ वर्षीय मुलीच्या बालविवाहाचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती स्नेहालय उडान हेल्पलाइनला मिळाली आणि त्यानंतर अवघ्या काही तासांत हा विवाह रोखण्यात आला.हा विवाह संगमनेर तालुक्यातील २६ वर्षीय युवकासोबत होणार होता.
आई-वडिलांनीच का घेतला मुलीच्या लग्नाचा निर्णय?
गेल्या सहा महिन्यांपासून एका तरुणाने मुलीला वारंवार छळले, शाळेच्या परिसरात त्रास दिला आणि जबरदस्तीने लग्नासाठी दबाव टाकला.या संदर्भात कुटुंबाने पोलिसांकडे अनेकदा तक्रारी दिल्या,मात्र ठोस कारवाई झाली नाही.त्यामुळे मुलीच्या सुरक्षिततेसाठी आई-वडिलांनी तिला विवाहबद्ध करण्याचा निर्णय घेतला.
स्नेहालय उडान टीमची झपाट्याने कारवाई बालविवाह रोखला..!
स्नेहालयच्या उडान हेल्पलाइनवर मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम यांनी तातडीने कारवाई केली.ग्रामसेवक व बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांना सतर्क करण्यात आले..ग्रामसेवक स्वतःबालविवाह प्रतिबंधक अधिकारी आणि स्थानिक ग्राम बाल संरक्षण समितीचे सदस्य मुलीच्या घरी पोहोचल्यावर कुलूप आढळले, मात्र चौकशीत समजले की विवाह संगमनेर तालुक्यातील शिपलापूर येथे होणार आहे. उडान टीमला ही माहिती दिल्यानंतर ताबडतोब उडानचे प्रकल्प व्यवस्थापक यांनी संगमनेर तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई करण्यास सांगण्यात आले.तत्काळ ग्रामसेवकांनी विवाहस्थळी जाऊन नोटिसा बजावल्या आणि विवाह रोखण्यात आला..
शिक्षणाच्या उज्ज्वल स्वप्नांना मिळाले नवे बळ
मुलगी हुशार असून तिचे शिक्षण सुरू ठेवण्याची तीव्र इच्छा होती. मात्र,सततच्या मानसिक त्रासामुळे ती गोंधळात पडली होती.उडान टीमने तिचे समुपदेशन करून तिला मानसिक आधार दिला आणि तिच्या दहावीच्या परीक्षांसाठी तयारी करण्यात मदत केली.
बालविवाह रोखण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे..!
बालविवाह हा केवळ बेकायदेशीर नसून तो मुलीच्या आरोग्यास,शिक्षणास आणि उज्ज्वल भविष्यास घातक ठरतो.जर कोणत्याही अल्पवयीन मुलीचा विवाह होत असेल किंवा होणार असल्याची माहिती मिळाल्यास त्वरित खालील हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा:
📞 स्नेहालय उडान हेल्पलाइन – 9011026495
📞 चाइल्ड हेल्पलाइन –1098
पुढील प्रक्रिया मुलीच्या सुरक्षित भविष्यासाठी ठोस पावले
मुलीच्या परीक्षेनंतर, तिला आणि तिच्या कुटुंबाला बालकल्याण समितीसमोर सादर करून आवश्यक मदत आणि संरक्षण पुरवले जाणार आहे.
एकत्र येऊया,बालविवाह थांबवूया आणि मुलींच्या भविष्याला नवीन दिशा देऊया! टीम उडान…🌱🌱🤝 9011026465