अहिल्यानगर (प्रतिनिधी):-धारदार शस्त्रासह खुनाचा प्रयत्न करणाऱ्या सराईत आरोपीला तोफखाना पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. गौरव साळवे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.दिनांक ०५/०९/२०२४ रोजी नगर मनमाड रोडवरील दीपक पेट्रोल पंप येथे फिर्यादी व आरोपीचे पेट्रोल भरण्याच्या कारणातून वाद झाले होते. या वादातून आरोपी गौरव साळवे व त्याच्या सोबतच्या ६ इसमानी चारचाकी गाडीमध्ये येवून फिर्यादीस जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करत असताना तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत आरोपी गौरव साळवे हा संगम हॉटेल येथे असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे तोफखाना पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने संगम हॉटेल येथे सापळा लावून आरोपी गौरव साळवे हा पळण्याच्या तयारीत असताना त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेत अटक केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्जलसिंह राजपूत यांच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, सुनिल शिरसाठ, सुनिल चव्हाण, योगेश चव्हाण, सुधीर खाडे, सूरज वाबळे , वसीम पठाण, सतिष त्रिभुवन, सुजय हिवाळे, बाळासाहेब भापसे, सतिष भवर, महेश पाखरे,राहुल गुंडू यांनी केली.